पिसे शासकीय आश्रमशाळेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू !
उपचारादरम्यान विद्यार्थ्याची प्राणज्योत मालवली; तीन शिक्षक निलंबित केल्याची माहिती
राजू टपाल
शहापूर :- शहापूर आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत भिवंडी तालुक्यातील पिसे येथील शासकीय आश्रमशाळेत इयत्ता पाचवीत शिक्षण घेणाऱ्या ११ वर्षीय विद्यार्थ्याचा शुक्रवार, दिनांक ९ ऑक्टोबर २०२६ रोजी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या कारणाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. मृत विद्यार्थ्याचे नाव विवेक सुभाष भोये (वय ११ वर्षे) असे असून, तो शहापूर तालुक्यातील वंगणपाडा, खर्डी येथील रहिवासी होता. तो पिसे येथील शासकीय आश्रमशाळेत इयत्ता पाचवीत शिक्षण घेत होता.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्याने आश्रमशाळेतील एका शिक्षकाने त्याला उपचारासाठी शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र,विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर संबंधित शिक्षक तेथून निघून गेल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान,रुग्णालयात उपचार सुरू असताना विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.
या घटनेप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच, या प्रकरणात तीन शिक्षकांना निलंबित करण्यात आल्याचे समजते. मात्र,विद्यार्थ्याच्या मृत्यूचे नेमके कारण आणि या घटनेची संपूर्ण पार्श्वभूमी अद्याप स्पष्ट झालेली नाही.
आदिवासी विकास विभाग आणि संबंधित यंत्रणांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करून विद्यार्थ्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करणे आवश्यक आहे. तसेच,आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी,आपत्कालीन वैद्यकीय सुविधा आणि जबाबदार व्यक्तींची भूमिका याबाबतही तपास होणे गरजेचे आहे.