रायगडाला ‘राष्ट्रीय किल्ल्या’चा मान द्या!
महाराष्ट्राची अस्मिता राष्ट्रीय पातळीवर नेण्याची मागणी; पर्यावरण अभ्यासक डॉ. प्रशांत सिनकर यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवेदन
ठाणे :- सह्याद्रीच्या कडेकपारीत स्वराज्याची मशाल पेटविणारा आणि छत्रपती शिवरायांच्या सार्वभौम स्वप्नाचा साक्षीदार असलेला रायगड आता महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक व्हावा,या मागणीने जोर धरला आहे. रायगडाला ‘राष्ट्रीय किल्ला’ म्हणून गौरविण्याची मागणी पर्यावरण अभ्यासक डॉ. प्रशांत सिनकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सह्याद्रीच्या कुशीत दिमाखाने उभा असलेला रायगड हा केवळ ऐतिहासिक किल्ला नसून हिंदवी स्वराज्याची राजधानी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सार्वभौमत्वाचा साक्षीदार आहे. याच गडावर शिवरायांचा ऐतिहासिक राज्याभिषेक झाला. त्यामुळे रायगडाचा इतिहास केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून भारतीय स्वराज्याच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा अध्याय असल्याचे डॉ. सिनकर यांनी निवेदनात म्हटले आहे. कमळ राष्ट्रीय फूल,वाघ राष्ट्रीय प्राणी आणि मोर राष्ट्रीय पक्षी म्हणून देशाच्या अस्मितेची प्रतीके आहेत. त्याच धर्तीवर भारताच्या स्वराज्य,शौर्य आणि राष्ट्रनिर्मितीच्या इतिहासाचे प्रतीक म्हणून एका ऐतिहासिक किल्ल्याला ‘राष्ट्रीय किल्ला’ म्हणून गौरविण्यात यावे,अशी भूमिका सिनकर यांनी मांडली आहे. या सन्मानासाठी रायगडापेक्षा योग्य किल्ला दुसरा कोणता असू शकतो,असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. रायगडाच्या मातीत स्वराज्याची शपथ, तटबंदीत संघर्षाची गाथा आणि प्रत्येक वास्तूत शिवरायांच्या दूरदृष्टीची साक्ष दडलेली आहे. या गडाने मराठा सामर्थ्याला दिशा दिली आणि पुढील काळातील भारतीय राजकीय इतिहासावरही त्याचा दूरगामी प्रभाव पडला. त्यामुळे रायगड हा महाराष्ट्राच्या अभिमानासोबतच भारताच्या स्वराज्याच्या इतिहासाचे राष्ट्रीय प्रतीक होण्याची क्षमता असलेला किल्ला आहे,असे डॉ. सिनकर यांनी नमूद केले. रायगडाला ‘राष्ट्रीय किल्ला’ म्हणून गौरविण्याचा निर्णय हा केवळ एका गडाचा सन्मान ठरणार नाही,तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेचा, मराठ्यांच्या शौर्याचा,सह्याद्रीच्या अस्मितेचा आणि भारताच्या स्वराज्याच्या इतिहासाचा राष्ट्रीय गौरव ठरेल,असे निवेदनात म्हटले आहे. रायगड महाराष्ट्राचा अभिमान आहेच आता तो भारताच्या राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक व्हावा अशी भक्कम भूमिका घेत महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेऊन केंद्र सरकारकडे याबाबत अधिकृत प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी डॉ. सिनकर यांनी केली आहे. रायगड हा केवळ दगड मातीचा किल्ला नाही; तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेचा जिवंत साक्षीदार आहे. रायगड पासून सुरू झालेले मराठ्यांचे साम्राज्य हे दिल्लीच्या पुढेही पसरलेले होते. त्यामुळे मराठ्यांच्या आणि भारताच्या इतिहासात रायगडचे एक वेगळे स्थान आहे. रायगडाला राष्ट्रीय स्तरावर विशेष सन्मान मिळाल्यास तो भारतातील एक महत्त्वाच्या किल्ल्याचा गौरव असेल. ही मागणी भावनिक असली तरी तिच्यामागे भक्कम ऐतिहासिक आधार आहे.
–सचिन जोशी,गडकिल्ले अभ्यासक