• Total Visitor ( 739021 )
News photo

आळंदीत अशोका विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

Raju Tapal publisher October 21, 2026 38

आळंदीत अशोका विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा



तक्षशिला बुद्ध विहारात धार्मिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम,बौद्ध उपासक-उपासिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...



गौतम पाटोळे.



आळंदी :- अशोका विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून भारतीय बौद्ध महासभा,आळंदी शहर आणि तक्षशिला बुद्ध विहार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व तक्षशिला बुद्ध विहार,आळंदी देवाची येथे विविध धार्मिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला आळंदी व परिसरातील बौद्ध उपासक-उपासिका, युवक-युवती आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.१४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या ऐतिहासिक घटनेने भारतीय समाजपरिवर्तनाच्या चळवळीला नवी दिशा दिली. समता,स्वातंत्र्य,बंधुता आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या या ऐतिहासिक दिवसाचे स्मरण आळंदीतील तक्षशिला बुद्ध विहारात श्रद्धा व उत्साहात करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात आळंदी नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका आयु. सुनिताताई रंधवे आणि भारतीय बौद्ध महासभा,आळंदी शहरचे ज्येष्ठ सल्लागार आयु. भीमराव थोरात यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सामूहिक त्रिशरण, पंचशील व बुद्धवंदना घेण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु.आनंद रणदिवे यांनी केले. त्यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले.यानंतर आयु.नामदेव सुरपल्लीकर आणि श्रामणेर आयु. विजय सोनवणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मकार्यातील योगदानावर तसेच बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानावर मार्गदर्शन केले. बौद्ध धम्म हा केवळ धार्मिक आचारांचा भाग नसून प्रज्ञा,शील,करुणा आणि विवेक यांच्या आधारे जीवन जगण्याची मानवतावादी पद्धत आहे, असे त्यांनी नमूद केले.यावेळी गौतम बुद्धांनी दिलेल्या चार आर्यसत्यांचे आणि आर्य अष्टांगिक मार्गाचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. जीवनातील दुःख,दुःखाची कारणे,दुःखाचा निरोध आणि दुःखनिरोधाचा मार्ग यांचे विवेचन करताना सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प,सम्यक वाचा,सम्यक कर्म, सम्यक आजीविका,सम्यक व्यायाम,सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी या आठ अंगांचे आचरण केल्याने व्यक्तीला विवेकपूर्ण,शांततामय व नैतिक जीवन जगण्याची दिशा मिळते, असे सांगण्यात आले. बौद्ध धम्मातील समता,बंधुता आणि मानवकल्याणाची शिकवण आजच्या समाजासाठीही तितकीच महत्त्वाची असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी धम्मपालन गाथा घेण्यात आली. त्यानंतर उपस्थितांना पारंपरिक खिरीचे वाटप करण्यात आले.संपूर्ण कार्यक्रमादरम्यान बुद्धवंदना,धम्मविचार आणि सामाजिक समतेच्या संदेशामुळे विहार परिसरात मंगलमय व धार्मिक वातावरण निर्माण झाले होते.या कार्यक्रमाला आळंदी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे आणि विद्यमान नगरसेवक गोविंद कुऱ्हाडे, सागर कुऱ्हाडे,सौरभ गव्हाणे यांनी आवर्जून उपस्थित राहून बौद्ध बांधवांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे संदीप रंधवे, ज्ञानेश्वर रंधवे,प्रविण रंधवे,विश्वनाथ थोरात, विनायक गायकवाड,सुभाष भोसले, राजेंद्र भोसले, राहुल रंधवे,राहुल डुमणे, समाधान झरे,अमोल कांबळे,अजित थोरात,बाळासाहेब पो. भोसले,अशोक थोरात,प्रशांत रंधवे,संजय रंधवे, रोहित रणदिवे,अण्णासाहेब वाघमारे, अक्षय रंधवे, सुधाकर गायकवाड, माऊली कांबळे, नितीन थोरात,बाळासाहेब दादू भोसले,प्रशांत भोसले,रविंद्र नि. रंधवे, राजेंद्र रंधवे,महेंद्र रंधवे, निखिल रंधवे, शुभम रणदिवे,अभिषेक रंधवे, राजवर्धन रंधवे,अथर्व रणदिवे आणि चारुदत्त रंधवे यांच्यासह आळंदी व परिसरातील बौद्ध उपासक-उपासिका, युवक-युवती आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement