टिटवाळा रेल्वे स्थानकावर ‘जीवन रक्षा अभियान’...
रेल्वे रुळ ओलांडू नका,सुरक्षित प्रवासासाठी रेल्वे पोलिसांचे प्रवाशांना आवाहन...
राजू टपाल.
टिटवाळा :- रेल्वे प्रवासादरम्यान होणारे अपघात टाळण्यासाठी आणि प्रवाशांमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आसनगाव रेल्वे पोलीस ठाण्याच्या वतीने बुधवार,२१ ऑक्टोबर २०२६ रोजी टिटवाळा रेल्वे स्थानकावर ‘जीवन रक्षा अभियान’ राबविण्यात आले. या मोहिमेद्वारे रेल्वे रुळ ओलांडू नका, वाहतूक नियमांचे पालन करा आणि स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घ्या, असा महत्त्वपूर्ण संदेश प्रवाशांना देण्यात आला.टिटवाळा रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक १,२ आणि ३ येथे सकाळी १०.२० ते ११.३० या वेळेत हे अभियान राबविण्यात आले. लोकल पकडण्याच्या घाईत काही प्रवासी रेल्वे रुळ ओलांडून जाण्याचा धोकादायक मार्ग अवलंबतात. अशा प्रकारांमुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता असल्याने रेल्वे पोलिसांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत ही जनजागृती मोहीम हाती घेतली.पोलिसांनी मानवी साखळी तयार करून केले प्रबोधन आसनगाव रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रेल्वे स्थानक परिसरात मानवी साखळी तयार करून प्रवाशांना सुरक्षित रेल्वे प्रवासाचे महत्त्व पटवून दिले.या मोहिमेत महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक भगत, पोलीस उपनिरीक्षक बारामतीकर, पाठक व धुमसे यांच्यासह २२ पोलीस अंमलदार,चार होमगार्ड,रेल्वे सुरक्षा बलाचे (RPF) टिटवाळा येथील पोलीस उपनिरीक्षक ओझा व दोन जवान तसेच एक महाराष्ट्र सुरक्षा बलाचा (MSF) जवान सहभागी झाला होता. याशिवाय सुमारे ४० ते ५० महिला व पुरुष उपस्थित होते.प्रवाशांना दिल्या महत्त्वपूर्ण सूचना या अभियानादरम्यान रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना विविध सूचनांद्वारे सुरक्षिततेचे महत्त्व समजावून सांगितले. रेल्वे रुळ ओलांडू नका,अवाजवी धाडस करू नका,तिकीट काढूनच प्रवास करा, रेल्वे प्रवासादरम्यान स्टंटबाजी टाळा आणि रेल्वे परिसर स्वच्छ ठेवा,असे आवाहन करण्यात आले.‘जीवन अनमोल आहे’,‘घरी कोणीतरी आपली वाट पाहत आहे’ आणि ‘सुरक्षित प्रवास हाच प्रत्येक रेल्वे प्रवाशाचा मुख्य उद्देश असला पाहिजे’, अशा संदेशांतून प्रवाशांचे प्रबोधन करण्यात आले. तसेच प्रवासादरम्यान अडचण आल्यास जीआरपी हेल्पलाइन क्रमांक १५१२ वर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले. संशयास्पद वस्तूंना हात लावू नये आणि अशा वस्तू आढळल्यास तातडीने रेल्वे पोलिसांना माहिती द्यावी,अशी सूचनाही यावेळी देण्यात आली.‘Help Us to Help You’ या संदेशातून रेल्वे पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.सुरक्षित रेल्वे प्रवासासाठी पोलिसांचे आवाहन रेल्वे प्रवासादरम्यान नियमांचे पालन करणे ही प्रत्येक प्रवाशाची जबाबदारी आहे. काही क्षणांची घाई जीवावर बेतू शकते. त्यामुळे रेल्वे रुळ ओलांडण्याचा धोका टाळून अधिकृत पादचारी पूल,जिने किंवा इतर निर्धारित मार्गांचाच वापर करावा, असे आवाहन रेल्वे पोलिसांकडून करण्यात आले.या अभियानाच्या माध्यमातून रेल्वे प्रवाशांमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्याचा आणि रेल्वे अपघातांना आळा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला.