केडीएमसी मध्ये सहाय्यक आयुक्त संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात मोठे फेरबदल !
सुष्मिता वरघट.
कल्याण : प्रतिनिधी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत सहाय्यक आयुक्त संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने या बदल्या करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या स्वाक्षरीने ४ ऑक्टोबर २०२६ रोजी हा आदेश काढण्यात आला. त्यानुसार सहाय्यक आयुक्त संवर्गातील अधिकाऱ्यांना त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या पदावर व प्रभागात बदली करण्यात आली आहे.
आदेशानुसार धनंजय थोरात, सचिन तामखेडे,अभिमान पवार, उमेश यमगर आणि विजय भोईर यांच्या पदभार व कार्यक्षेत्रात बदल करण्यात आला आहे. काही अधिकाऱ्यांना प्रभाग बदलून देण्यात आला असून, काहींना अतिरिक्त कार्यभारही सोपविण्यात आला आहे. याशिवाय चंद्रकांत जगताप, अधीक्षक यांच्याकडे सामान्य प्रशासन मुख्यालयातील प्र. सहाय्यक आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या अस्तित्वातील कार्यभारासह अतिरिक्त जबाबदारी सांभाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बदली झालेल्या सर्व सहाय्यक आयुक्तांनी तात्काळ नवीन ठिकाणी हजर होऊन कामकाज स्वीकारावे, तसेच सोपविण्यात आलेल्या कार्यभाराचा स्वीकार केल्याचा अहवाल सामान्य प्रशासन मुख्यालयाकडे सादर करावा, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, बदलीच्या ठिकाणाबाबत मिळालेल्या/सोपविण्यात आलेल्या कार्यभारात कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव आणल्यास संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम २३ नुसार शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशाराही आदेशातून देण्यात आला आहे. या फेरबदलामुळे KDMC च्या विविध प्रभागांतील प्रशासकीय कामकाजावर परिणाम होणार असून, आगामी काळात सहाय्यक आयुक्तांच्या नव्या जबाबदाऱ्यांमुळे पालिका प्रशासनाची कार्यक्षमता वाढते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.