• Total Visitor ( 720665 )
News photo

टिटवाळ्याची योगिता गावित भारतीय सॉफ्टबॉल संघात...

Raju Tapal publisher October 07, 2026 25

टिटवाळ्याची योगिता गावित भारतीय सॉफ्टबॉल संघात...



स्पर्धेसाठी आर्थिक मदतीचे आवाहन



राजू टपाल.

टिटवाळा :- टिटवाळ्यातील २१ वर्षीय योगिता मोतीराम गावित हिची सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. आगामी २२ ते २६ ऑक्टोबरदरम्यान चीनमधील तैवान येथे ही स्पर्धा होणार असून, या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी योगिताला मिळाली आहे.

या स्पर्धेसाठी एका खेळाडूला अंदाजे अडीच ते तीन लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यामध्ये प्रवास, राहण्याची व्यवस्था, भोजन, निवड प्रक्रिया तसेच इतर आवश्यक खर्चाचा समावेश आहे. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे योगितासमोर स्पर्धेत सहभागी होण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

योगिता गावित ही टिटवाळा येथील गणेश मंदिर रोडवरील केएनटी स्कूलजवळील सोहम प्लाझा इमारतीतील खोली क्रमांक ३०१ येथे आपल्या कुटुंबासह राहते. तिचे वडील बसचालक असून आई गृहिणी आहे. योगिताला एक भाऊ आहे. तिचे दहावीपर्यंतचे शिक्षण रेश्माई विद्यालयात झाले असून सध्या ती कल्याण येथील बिर्ला महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे.

भारतीय संघात निवड होण्यासाठी योगिताने कठोर मेहनत घेतली आहे. मात्र आर्थिक अडचणींमुळे देशाचे प्रतिनिधित्व करण्याची ही संधी हातातून जाऊ नये,अशी तिची इच्छा आहे.

त्यामुळे टिटवाळा परिसरातील नागरिक, दानशूर व्यक्ती, समाजसेवक, उद्योजक आणि क्रीडाप्रेमींनी योगिताला आर्थिक मदत करून तिच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील सहभागाला हातभार लावावा, असे आवाहन योगिता गावित हिने केले आहे.

योगिताने मदतीसाठी स्कॅनरद्वारे तसेच 7400161066 या क्रमांकावर PhonePe किंवा Google Pay द्वारे शक्य ती आर्थिक मदत करण्याची विनंती केली आहे.

“आपल्या छोट्याशा मदतीमुळे टिटवाळ्याची मुलगी भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न पूर्ण करू शकते,”असे आवाहन योगिताने केले आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement