अ प्रभागातील रानटी झुडपे हटवून जंतुनाशक फवारणी करा...
नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर,अॅड.जितेंद्र जोशी यांचे केडीएमसी प्रशासनाला निवेदन...
साक्षी पवार.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अ प्रभाग क्षेत्रातील मुख्य रस्ते,अंतर्गत रस्ते तसेच नाले व गटारांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या रानटी झुडपांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. ही झुडपे तातडीने हटवून संबंधित ठिकाणी जंतुनाशक फवारणी करण्यात यावी,अशी मागणी अॅड. जितेंद्र जयंत जोशी यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी २२ ऑक्टोबर २०२६ रोजी केडीएमसी प्रशासनाकडे लेखी निवेदन सादर केले.अ प्रभाग क्षेत्रातील रस्त्यांच्या कडेला तसेच नाले व गटारांच्या आसपास मोठ्या प्रमाणात रानटी झुडपे वाढली आहेत. या झुडपांवर रस्त्यावरील धूळ साचत असून,परिसरात डास,कीटक आणि जंतूंचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो,असे निवेदनात नमूद करण्यात आले आहेडासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागू शकतो. तसेच अस्वच्छ परिसरामुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे जोशी यांनी म्हटले आहे.अ प्रभाग क्षेत्रातील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते,नाले आणि गटारांच्या परिसरातील रानटी झुडपे तातडीने काढून त्या ठिकाणी जंतुनाशक फवारणी करावी,अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या निवेदनाच्या प्रती महापालिकेचे कार्यकारी अभियंता,सार्वजनिक आरोग्य अधिकारी,अ प्रभाग क्षेत्राचे सहायक आयुक्त,उपअभियंता तसेच स्वच्छता निरीक्षक यांना देण्यात आल्या आहेत. आता या मागणीवर केडीएमसी प्रशासनाकडून कोणती कार्यवाही केली जाते,याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.