कवठे येमाई येथील ऊसाच्या शेतात मृतदेह
शिक्रापूर (प्रतिनिधी) :- कवठे येमाई येथील गांजेवाडी,गणेशनगर परिसरातील ऊसाच्या शेतात फाकटे येथील देवराम नानाभाऊ टेके वय-५० या ग्रामस्थाचा मृतदेह आढळून आला आहे.
या घटनेबाबत समजलेल्या माहितीनूसार, शिरूर तालुक्यातील फाकटे येथील देवराम टेके मंगळवारी दि.१९ आॅगस्टला सकाळी ९ वाजल्यानंतर दिवसभर घरी परतले नाहीत.नातेवाईकांच्या मते सकाळी पावणेदहा वाजेपर्यंत त्यांचा फोन सुरू होता. त्यानंतर त्यांचा फोन बंद झाला. त्यामुळे मुलांनी व नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला.
फाकटे येथील एका युवकाने मंगळवारी टेके यांना गणेशनगर -गांजेवाडी रस्त्याने जाताना पाहिल्याचे त्यांच्या नातेवाईकांना सांगितल्यानंतर टेके यांच्या नातेवाईकांनी बुधवारी सकाळी त्या रस्त्याने जावून शोध घेतला असता कवठे येमाई येथील गांजेवाडी रस्त्यावरील पोल्ट्री शेजारी त्यांची दुचाकी सापडली. दुचाकीपासून अर्धा किलोमीटर अंतरावर ऊसाच्या शेताच्या कडेला त्यांचा मृतदेह आढळला. मृतदेहाच्या डोक्याला व मानेजवळ गंभीर जखमा असून खुनाचा संशय व्यक्त केला जात आहे.
शिरूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कारंडे, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण घटनास्थळी दाखल झाले. पोलीसांनी या घटनेचा तपास वेगाने सुरू केला आहे असे समजते.