वरप ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकासह सदस्यांवर गुन्हा दाखल
खोट्या सह्या करून बनावट कागदपत्र बनवून अफरातफरी केल्याचे प्रकरण
राजू टपाल.
टिटवाळा :- कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरप ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकासह तब्बल सात ग्रामपंचायत सदस्यांवर खोट्या सह्या,खोटे कॅशबुक,बनावट कागदपत्रे तसेच पैश्यांची अफरातफर केल्या प्रकरणी सरपंच छाया महेंद्र भोईर यांनी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या बाबतचे सविस्तर वृत्त असे की वरप गावच्या सरपंच पदी अनुसूचित जमातीच्या छाया महेंद्र भोईर यांनी 8 फेब्रुवारी 2021 पासून सरपंच पदाचा पदभार स्वीकारला त्यानंतर ऑगस्ट 2021 रोजी पासून वरप ग्रामपंचायती मध्ये तानाजी पाखरे हे रुजू झाल्यापासून ग्रामपंचायती मधील संदीप देविदास पावशे,राजश्री प्रकाश गोंधळे,महेश एकनाथ गोंधळे,दीपिका स्वप्नील भोईर,मीना गुरुनाथ कुर्ले,रविना विजय भोईर,निलेश सुरेश कडू यांनी आपसात संगनमत करून ऑगस्ट 2021 पासून ते 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत सरपंच छाया महेंद्र भोईर यांचे शिक्षण 4 थी पर्यंत झालेले असल्याने त्यांची सही हि सोपी असल्याच्या कारणाने त्याचा गैरफायदा घेऊन त्यांच्या खोट्या सह्या करून बनावट व खोटे कॅशबुक तयार करून तसेच खोटे व बनावट तयार करून तसेच ग्रामपंचायतीच्या धनादेशावर खोट्या सह्या करून ग्रामपंचायतीच्या पैशांची अफरातफर केल्या प्रकरणी सरपंच छाया महेंद्र भोईर यांनी दिलेल्या फिर्यादी वरून कल्याण तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता 2023 कलम 318 (4),316(5),338,336(3),340(2),3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय मारुती नलावडे हे करीत आहे.