चोरी,घरफोडी करणा-या सराईत चोरट्यांना अटक ;
Raju Tapal
October 26, 2021
42
चोरी,घरफोडी करणा-या सराईत चोरट्यांना अटक ; अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखा पोलीसांची कारवाई
रात्रीच्या वेळी घराचे दरवाजे तोडून लोकांना हत्याराने मारहाण करून दरोडे घालणारे दोन सराईत चोरटे अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखा पोलीसांनी पाठलाग करून पकडले.
जावेद उर्फ जहीर घड्याळ्या चव्हाण वय -25 रा.सुरेगाव ता.श्रीगोंदा , महावीर घड्याळ्या चव्हाण वय -21 रा. सुरेगाव ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर अशी पाठलाग करून पकडण्यात आलेल्या दोघा चोरट्यांची नावे आहेत.
या चोरट्यांकडून 87 हजार 500 रूपये किंमतीच्या चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. सुरेगाव शिवारातील डोंगरावर ही कारवाई करण्यात आली.
सोमवारी रात्री दि.18 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री निवडुंगे कुटूंब घरामध्ये झोपलेले असताना अनोळखी आरोपींनी घराच्या लोखंढी जाळीचा सेफ्टी दरवाजा लोखंडी कटावणीच्या साहाय्याने तोडून लाकडी दरवाजा तोडून घरामध्ये प्रवेश केला. घरातील लोकांना लोखंडी कटावणी व गजाने मारहाण करून कपाटामधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 78 हजारांचा ऐवज दरोडा टाकून नेल्याप्रकरणी सरिता निवडूंगे रा.सुपा शिवार ता.पारनेर यांच्या फिर्यादीवरून सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी या गुन्ह्याच्या तपासकामी स्वतंत्र पथक नेमून आरोपींचा शोध घेवून तपासाच्या सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी गुन्ह्याच्या तपासाकरिता स्वतंत्र पथक नेमून मिळालेल्या आरोपींच्या ठावठिकाण्यावरून सुरेगाव शिवारातील डोंगरावर पाठलाग करून आरोपींना ताब्यात घेतले
Share This