चोरून नेलेल्या दुचाकीसह दुचाकीचोर तासाभरात वाई गुन्हे शोध पोलीसांच्या ताब्यात
Raju Tapal
October 29, 2021
39
चोरून नेलेल्या दुचाकीसह दुचाकीचोर तासाभरात वाई गुन्हे शोध पोलीसांच्या ताब्यात ; वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांची कामगिरी
-
आंब्याच्या झाडाखाली लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दाखल होताच वाई गुन्हे शोध पथकाने तत्परता दाखवत चोरट्याचा तासाभरात पाठलाग करून चोरट्याला गजाआड केले.
सुधीरकुमार केंगारे वय -२४ रा. गारगोटी ता. भुदरगड जि. कोल्हापूर असे दुचाकी चोरट्याचे नाव आहे.
वाई - सातारा रस्त्यावर बावधन बगाड रस्ता या ठिकाणी बादल प्रकाश रिठे वय -२४ रा. बावधन ता.वाई यांच्या मालकीचे वडापावचे दुकान असून सकाळी नेहमीप्रमाणे रिठे यांनी वडापावचे दुकान उघडून शेजारी असलेल्या आंब्याच्या झाडाखाली त्यांच्या मालकीची एम एच १२ जे पी ८५५७ या क्रमांकाची ४८ हजार रूपये किंमतीची दुचाकी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास लॉक करून उभी केली होती. अज्ञात चोरट्याने डुप्लिकेट चावीचा वापर करून ती चोरून नेली.
याची तक्रार दुचाकीचे मालक बादल रिठे यांनी वाई पोलीस ठाण्यात दाखल करताच पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी भर दिवसा चोरट्यांनी लंपास केलेल्या दुचाकीचा वाई सातारा रोड परिसरासह महामार्ग क्रमांक ४ च्या परिसरात शोध घेण्यासाठी आदेश दिले.
डि बी च्या पथकाने शोध मोहिमेस सुरूवात करत पाचवडच्या दिशेने जात असताना त्यांच्या पुढे काही अंतरावर एक तरूण दुचाकीवरून एक तरूण सुसाट जाताना दिसत होता.
हाच संशय धरून पथकाने त्याचा पाठलाग करून त्याला थांबविले. गाडीची कागदपत्रे त्याला मागितली असता त्याला ती दाखवता आली नाही. त्यास दुचाकीसह ताब्यात घेवून वाई पोलीस ठाण्यात आणले.
वाई पोलीसांनी सुधीरकुमार केंगारे याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल केला.
हवालदार एस एस जाधव अधिक तपास करत आहेत.
Share This