आंबोली ग्रामपंचायतीचा भ्रष्टाचार उघड
गरीब मागासवर्गीयाला १५% अनुदानापासून वंचित ठेवत मर्जीतील लोकांना वाटप!
१४ ऑगस्टपर्यंत न्याय न मिळाल्यास १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
सावंतवाडी :- आंबोली-जकातवाडी येथील अनुसूचित जातीतील गरीब नागरिक अरुण जनार्दन चव्हाण यांना ग्रामपंचायत प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या १५% शासकीय अनुदानापासून गेली अनेक वर्षे मुद्दामहून वंचित ठेवण्यात आले आहे. पात्र व गरजू लाभार्थ्यांना दूर ठेवून, माजी सैनिक,व्यावसायिक,नोकरीधारक,दारिद्र्यरेषेबाहेरील आणि अगदी मृत व्यक्तींनाही हा लाभ देऊन ग्रामपंचायतने भ्रष्टाचाराचे गंगाजळ उघड केले आहे, असा थेट आरोप चव्हाण यांनी केला आहे.
अनेकदा अर्ज, तक्रारी आणि उपोषण करूनही ग्रामपंचायत, ग्रामविकास अधिकारी आणि तत्कालीन-विद्यमान सरपंच यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. "आम्हाला ‘पुढील वर्षी लाभ देऊ’ अशी खोटी आश्वासने देऊन वर्षानुवर्षे फसवणूक करण्यात आली. नियम धाब्यावर बसवून, अनुसूचित जातीतील खर्या गरिबांना हक्काचा लाभ न देता मर्जीतील लोकांच्या खिशात पैसा घालण्याचा प्रकार उघड उघड सुरू आहे," असा चव्हाण यांचा संताप आहे.
चव्हाण यांनी ठाम इशारा दिला आहे की, १४ ऑगस्टपर्यंत न्याय न मिळाल्यास, १५ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातंत्र्यदिनीच जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गासमोर जाहीर उपोषण सुरू करणार असून, जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई होईपर्यंत लढा सुरु राहील."गरीबांचा हक्क खाणारे हे भ्रष्ट लोकशाहीचे गद्दार आहेत;यांना कायद्याने शिक्षा झालीच पाहिजे,"असा थेट घणाघात चव्हाण यांनी केला आहे.