कल्याण तालुका पोलिसांकडून महिलांसाठी सायबर जनजागृती चर्चासत्र...
म्हारळ व पंचक्रोशीतील ५ ते ६ हजार महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
राजू टपाल.
टिटवाळा : महाराष्ट्र सायबरच्या सायबर जनजागृती उपक्रमांतर्गत कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने सायबर सुरक्षा, सायबर हायजिन, जीआरएम तसेच सायबर गुन्हे घडण्यापूर्वी घ्यावयाची खबरदारी आणि गुन्हा घडल्यानंतर करावयाची कार्यवाही याबाबत विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.
वरप गाव येथील मोनालिसा लॉन्स येथे सकाळी ११.४५ ते दुपारी १२.३० या वेळेत हे चर्चासत्र पार पडले. या कार्यक्रमाला म्हारळ तसेच पंचक्रोशीतील तब्बल ५ ते ६ हजार महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमादरम्यान डिजिटल माध्यमे आणि स्क्रीनच्या सहाय्याने सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करणारे व्हिडिओ दाखविण्यात आले. ऑनलाइन फसवणूक, सायबर गुन्हे, डिजिटल सुरक्षितता तसेच सोशल मीडिया आणि इंटरनेटचा सुरक्षित वापर याबाबत महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.
सायबर गुन्ह्यांना बळी पडू नये यासाठी नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी, तसेच सायबर फसवणूक झाल्यास घाबरून न जाता तातडीने कोणती पावले उचलावीत, याबाबतही सविस्तर माहिती देण्यात आली.
या जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी व अंमलदार यांनी योग्य ते सहकार्य, मार्गदर्शन आणि नियोजन केले. मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतल्याने सायबर सुरक्षेबाबत जनजागृतीचा संदेश मोठ्या प्रमाणात नागरिकांपर्यंत पोहोचला.