• Total Visitor ( 721644 )
News photo

दिवाळीच्या सुटीनंतर ‘पॅट’चा पेपर; विद्यार्थ्यांचा ताण वाढणार !

Raju Tapal publisher October 08, 2026 21

दिवाळीच्या सुटीनंतर ‘पॅट’चा पेपर; विद्यार्थ्यांचा ताण वाढणार !



शिक्षक संघटनांचा विरोध; ‘पॅट’ परीक्षा प्रथम सत्र परीक्षेसोबत घेण्याची मागणी



अमरावती :- राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत दरवर्षी सत्र परीक्षेदरम्यान संकलित मूल्यमापन चाचणी अर्थात ‘पॅट’ परीक्षा घेण्यात येते. मात्र, यंदा जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार ‘पॅट-२’ परीक्षा दिवाळीच्या सुट्टीनंतर घेण्यात येणार असल्याने शिक्षक संघटनांनी या निर्णयाला विरोध केला आहे. दिवाळीच्या सुट्टीनंतर लगेचच विद्यार्थ्यांवर परीक्षेचा ताण टाकणे योग्य नसल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. राज्यात दिवाळीच्या सुट्टीत बहुतांश विद्यार्थी मूळगावी किंवा अन्यत्र फिरण्यासाठी जातात. यंदा मात्र सुट्टी संपल्यानंतर शाळेत परतताच विद्यार्थ्यांना ‘पॅट’ परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे सुट्टीचा आनंद घेण्याऐवजी विद्यार्थ्यांवर परीक्षेची चिंता राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शिक्षण विभागाकडून इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी दरवर्षी ‘पॅट’ परीक्षा घेतली जाते. यंदा परिषदेकडून जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार भाषा, गणित आणि इंग्रजी या तीन विषयांची ‘पॅट-२’ चाचणी दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर नोव्हेंबरमध्ये होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुट्टीच्या काळातही परीक्षेची तयारी करावी लागण्याची शक्यता आहे. ‘तणावमुक्त शिक्षणाचा विचार आवश्यक’ सुटीनंतर लगेच परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांवर मानसिक दबाव निर्माण होऊ शकतो. विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य आणि तणावमुक्त शिक्षण यांचा विचार करून परीक्षेचे नियोजन करणे आवश्यक आहे, अशी भूमिका महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अजयानंद पवार यांनी व्यक्त केली.



ऑक्टोबरमध्ये परीक्षा घेण्याची मागणी 



सुटीनंतर पुन्हा परीक्षेची तयारी करावी लागल्यास विद्यार्थ्यांवर अनावश्यक मानसिक दबाव येऊ शकतो. त्यामुळे तणावमुक्त शिक्षणाच्या दृष्टीने ‘पॅट’ परीक्षा ऑक्टोबरअखेर घेणे अधिक योग्य ठरेल,असे लोमेश खैरकर मुख्याध्यापक,जि.प. हायस्कूल उत्तमसरा यांनी सांगितले. शाळांमध्ये प्रथम सत्र परीक्षेचे नियोजन ऑक्टोबरमध्ये केले जाते. त्याच कालावधीत ‘पॅट’ परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांचा ताण कमी होऊन शाळांचे शैक्षणिक नियोजनही अधिक सुकर होईल,असे श्रीमती मिनाक्षी इंगळे मुख्याध्यापक,जि.प.शाळा उत्तमसरा यांनी सांगितले.



सुटीनंतर लगेच परीक्षा नको



सुट्टी संपल्यानंतर लगेच ‘पॅट’ परीक्षेची तयारी करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर येऊ नये. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करता ही परीक्षा प्रथम सत्र परीक्षेसोबत घेणे अधिक योग्य व व्यवहार्य ठरेल,असे शैलेश दहातोंडे मुख्याध्यापक जि.प.शाळा कोलटेक यांनी सांगितले. दरम्यान,शिक्षक संघटनांनी याबाबत शिक्षण आयुक्त तसेच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे निवेदन देऊन परीक्षेच्या वेळापत्रकाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. दिवाळीच्या सुटीनंतर विद्यार्थ्यांना थेट परीक्षेच्या तणावात न ढकलता त्यांना नियमित अभ्यासासाठी सकारात्मक वातावरण मिळावे, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात आली आहे. राजेश सावरकर,राज्य प्रसिध्दी प्रमुख महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती यांनीही ‘पॅट’ परीक्षा ऑक्टोबरअखेर प्रथम सत्र परीक्षेच्या नियोजनात घेण्याची मागणी केली आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement