दारूची नशा, पैशाचा माज !
पुण्यात मद्यधुंद तरुणाचे रस्त्यावरच अश्लील चाळे,
फुटपाथवर केली लघवी
'सिग्नलवर नाही तर माझ्या तोंडावर लघु शंका ..',
पोराच्या घाणेरड्या कृत्यावर बाप संतापला
पुणे :- पुण्यात मद्यधुंद तरुणाचा एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. येरवडा भागांमध्ये शास्त्रीनगर चौकात रस्त्यावरच अश्लील चाळे करण्याची हिम्मत या तरुणांनी केली आहे. आज सकाळी हे प्रकरण समोर आल्याची माहिती मिळाली आहे.तर या तरूणाची ओळख पटली असून, त्याचे वडिल हॉटेल व्यवसायिक आहेत.गौरव मनोज अहुजा असे तरूणाचे नाव असून, त्याच्या वडिलांचे नाव मनोज रमेश अहुजा आहे. या प्रकरणाबाबत तरूणाच्या वडिलांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
'तो माझा मुलगा आहे, याची मला लाज वाटते. व्हिडिओमध्ये जी गाडी दिसत आहे ती माझ्या नावावर आहे. माझ्या मुलानं सिग्नलवर लघु शंका केली नाही तर, माझ्या तोंडावर केली आहे', माझ्या मुलाचे नाव गौरव मनोज अहुजा तर, माझे नाव मनोज अहुजा आहे. माझ्यावर जी काही कारवाई होईल, ती मला मान्य आहे', असं तरूणाच्या वडिलांनी म्हटलं आहे.अशा शब्दात त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
तरूणाचा फोन सकाळपासून बंद आहे. त्याचे पालक देखील तरूणाचा शोध घेत असल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितलं. घडलेल्या घटनेबद्दल तरूणाच्या वडिलांनी पोलिसांसमोर खंत देखील व्यक्त केली आहे.
पोलीस काय म्हणाले?
येरवडा येथील घटनेच्या संबधित तरुणावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. अश्लील वर्तन करणे, सार्वजनिक वाहतूकीस अडथळा निर्माण करणे, या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.संबंधित तरुणाला शेधण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. संबंधित तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल. त्यानंतर त्याने मद्यपान केले होते की नाही हे स्पष्ट होईल, असे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या येरवडा भागांमध्ये शास्त्रीनगर चौकात पुणे नगर रोडवर हा प्रकार घडला आहे. दोन तरुण मद्यधुंद अवस्थेत रस्त्याच्या मधोमध गाडी उभी करून थांबले आहेत. त्यापैकी एक तरुण गाडीतून उतरून रस्त्यावरच लघुशंका करताना व्हिडिओमधून दिसत आहे. तसेच त्यावेळी त्याने रस्त्यावरच स्त्रियांसमोर अश्लील चाले केल्याचे दिसून आले आहे. तर गाडीत बसलेल्या दुसऱ्या तरुणाच्या हातात दारुची बाटली आहे. दोघेही हुल्लडबाजी करताना दिसून येत आहेत. आजुबाजुच्या लोकांनी जाब विचारला असता ते फुल स्पीड मध्ये गाडी चालवत वाघोलीच्या दिशेने गेल्याचे दिसते आहे.
पुण्याच्या रस्त्यावर अजूनही तरुण बिनधास्तपणे मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत आहेत. पोर्शे प्रकरणानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली होती. मात्र आता ती थंडावल्याने पुन्हा एकदा अशा तरुणांची हिम्मत वाढल्याचे चित्र आहे. मद्यधुंद अवस्थेत हे तरुण अतिशय वेगाने वाहन चालवत असल्याचे दिसते आहे. यामध्ये अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अपघात झाल्यास एखाद्या निष्पाप बळी जाण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लाक्ष लागून आहे.