'ऑपरेशन सिंदूर'वरून प्रश्न विचारताच '56 इंच' छातीची हवा निघाली !
'गुजरात समाचार'वर ईडीचे छापे,
मालक बाहुबली शाह यांना अटक
'गुजरात समाचार'चा आवाज दाबण्याचा प्रकार म्हणजे लोकशाहीचा आवाज दाबण्याचा डाव असल्याचा संताप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला व्यक्त
गुजरात :- केंद्रातील मोदी सरकारकडून तपास यंत्रणांचा गैरवापर सुरूच आहे. 'गुजरात समाचार' वर्तमानपत्राने 'ऑपरेशन सिंदूर'बाबत सरकारसमोर काही महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित करताच केंद्र सरकारच्या इशाऱ्यांवर चालणाऱ्या 'ईडी'ने 'गुजरात समाचार'वर छापे टाकून सूडबुद्धीने या वर्तमानपत्राचे मालक-संचालक बाहुबली शाह यांना शुक्रवारी अटक केली.त्यामुळे सरकारविरोधात बोलायचेच नाही का, असा सवाल केला जात असून सरकारने 'अभिव्यक्तिस्वातंत्र्या'वर घाला घातल्याची प्रतिक्रिया विविध स्तरातून व्यक्त होत आहे.
'गुजरात समाचार' हे लोकप्रकाशन कंपनीचे गुजरातमधील 'नंबर -1'चे वर्तमानपत्र आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे पत्रकारिता करणाऱ्या 'गुजरात समाचार' व्यवस्थापनामध्ये आर्थिक अनियमितता असल्याचे सांगत मुंबईवरून आलेल्या 'ईडी' (सक्त वसुली संचालनालय) ने 'गुजरात समाचार'च्या खानपूर येथील मुख्य कार्यालयावर छापा टाकला. शिवाय मालक बाहुबली शाह, मुख्य संपादक श्रेयांश शाह यांच्या निवासस्थानांवर छापा टाकल्यानंतर एस. जी. महामार्गावरील 'जीएसटीव्ही' चॅनेलवरही छापे टाकले. या कारवाईनंतर ईडीने 'गुजरात समाचार' कार्यालयाची आणि मालकांच्या निवासस्थानांची झाडाझडती घेतली. तब्बल दोन दिवसांच्या छापेमारीनंतर ईडीने मालक बाहुबली शाह यांना ताब्यात घेतले.
आयकर पाठोपाठ ईडीचा छापा
शहा बंधुंचे गुजरात समाचार टी.व्ही. हे न्युज चॅनलही असून, तुषार दवे हे त्याचे प्रमुख आहेत. तुषार दवे यांनी फेसबुक पोस्टमधून या कारवाईबाबत माहिती दिली. आधी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अहमदाबाद येथे गुजरात समाचार टी.व्ही.च्या कार्यालयावर धाड टाकली. तेथे 36 तास झाडाझडती सुरू होती. त्यानंतर 'ईडी'चे अधिकारी गुरुवारी रात्री आले आणि छापेमारी सुरू केली.
बाहुबली शाह यांची प्रकृती बिघडली
'ईडी' अधिकाऱ्यांनी बाहुबली शाह यांना ताब्यात घेतले असून, त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कशासाठी कारवाई केली हे 'ईडी'ने अद्याप सांगितले नाही, अशी माहिती दवे यांनी दिली.
केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयांवर टीका केली म्हणून कारवाई
अहमदाबाद येथून प्रकाशित होणाऱया 'गुजरात समाचार'ने नेहमी जनतेच्या प्रश्नाला वाचा पह्डली. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणावर गेली 25 वर्षांपासून टीका केली. त्यामुळे याच रागातून सूडबुद्धीने ईडीने कारवाई केल्याचे समजते. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जिग्नेश मेवाणी यांनी ईडी कारवाईचा निषेध केला आहे.
केवळ 48 तासांत वर्तमानपत्र कार्यालयाची झाडाझडती करून मालकाला झालेली अटक म्हणजे सरकारविरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रकार आहे. जो खरे बोलतो त्याचा आवाज सरकारकडून दाबला जातो. गुजरातची जनता लवकरच या 'तानाशाही'ला उत्तर देईल.
अरविंद केजरीवाल, 'आप' नेते
1932 मध्ये गुजरात समाचारची स्थापना झाली. 93 वर्षे जुन्या वर्तमानपत्रावर जुने प्रकरण उकरून कारवाई करण्यात आली. पुलवामा हल्ल्यानंतर '56 इंच छातीनी कायरता' असा निशाणा या वर्तमानपत्रातून पंतप्रधान मोदी यांच्यावर साधण्यात आला होता.
मुंबईतून आली अधिकाऱ्यांची फौज
आयकर विभागाने याच आठवडय़ात अहमदाबाद आणि आजूबाजूच्या परिसरातील 'गुजरात समाचार'शी संबंधित 24 ठिकाणांसह 30 ठिकाणी छापेमारी केली. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, गुंतवणूकदार,सरकारी पंत्राटदार आणि शेअर बाजार ब्रोकर यांच्यावरही कारवाई करण्यात आली. मुंबईतून आलेल्या ईडी अधिकाऱयांसह तब्बल 400 अधिकाऱयांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली.
20 वर्षे जुने प्रकरण
ईडीकडून करण्यात आलेली कारवाई तब्बल 20 वर्षांपूर्वीच्या एका व्यवहाराबाबत आहे. ही कारवाई राजकारणाचा भाग असल्याचे मुख्य संपादक श्रेयांश शाह म्हणाले. प्रामाणिक पत्रकारिता दाबण्याचा हा प्रकार असून या विरोधात आपण लढा देऊ, असे त्यांनी सांगितले.
लोकशाहीचा गळा घोटण्याचे मोदींचे आणखी एक कारस्थान
'गुजरात समाचार'चा आवाज दाबण्याचा प्रकार म्हणजे लोकशाहीचा आवाज दाबण्याचा डाव असल्याचा संताप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे. अपयशी सरकारला आरसा दाखवणाऱया वर्तमानपत्रांच्या कार्यालयांवर टाळे लावले जाते म्हणजेच लोकशाही संकटात आहे. बाहुबली यांची अटक म्हणजे मोदींच्या कारभाराची ओळखच असल्याचा टोलाही राहुल गांधी यांनी लगावला आहे.