माजी खासदार डाॅ.शालिनीताई पाटील यांचे निधन
पुणे:- माजी मुख्यमंत्री,दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या पत्नी माजी मंत्री,माजी खासदार डाॅ.शालिनीताई पाटील यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी शनिवारी दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास माहीम,मुंबई येथील निवासस्थानी निधन झाले. समजलेल्या माहितीनूसार,सत्यशोधक विचारांचे प्रणेते ज्योतिराव फाळके पाटील यांच्या त्या कन्या होत्या.त्यांनी कायद्याचे शिक्षण घेत कायद्याची पदवी संपादन केली होती.सांगली जिल्हा लोकल बोर्डाच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीत सुरूवात केली होती. विचारस्वातंत्र्य,सामाजिक न्याय,निर्भिड राजकीय भूमिका यासाठी त्या ओळखल्या जात. १९९९ मध्ये त्यांनी विधानसभेचे माजी सभापती काॅंग्रेसचे नेते शंकरराव जगताप यांचा पराभव केला होता. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या त्या निकटवर्तीय समजल्या जात. राज्याच्या महसूलमंत्री म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला होता. त्यांच्या पश्चात एक मुलगा,सून,दोन मुली,जावई,नातवंडे,पतवंडे असा परिवार आहे.