• Total Visitor ( 134306 )

भारताने पहिल्याच टी २० सामन्यात इंग्लंडला चारली धुळ; मिळवला दमदार विजय

Raju tapal January 23, 2025 110

भारताने पहिल्याच टी २० सामन्यात इंग्लंडला चारली धुळ; मिळवला दमदार विजय

कोलकात्ता:-भारताने पहिल्याच टी २० सामन्यात इंग्लंडला धुळ चारली. भारताच्या अभिषेक शर्माने यावेळी तुफानी फलंदाजी करत अर्धशतक झळकावले आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.पण त्यापूर्वी भारताचा विजय सोपा केला तो गोलंदाजांनी. अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती यांनी मोलाच्या विकेट्स मिळवल्या. त्यामुळे भारताला इंग्लंडच्या संघाला १३२ धावांवर ऑल आऊट करता आले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने दमदार सुरुवात केली. पण अभिषेकने फलंदाजीत सातत्य दाखवले आणि भारताचा सात विकेट्स राखून विजय सुकर केला. या विजयासह भारताने या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. अभिषेक शर्माने यावेळी वादळी फलंदाजी करताना ३४ चेंडूंत पाच चौकार आणि आठ षटकारांच्या जोरावर ७९ धावांची धावांची दमदार खेळी साकारली.

इंग्लंडच्या १३३ धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसनने संघाला वादळी सुरुवात करून दिली. संजूने इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. संजूला मोठी खेळी साकारता आला नाही. संजूने यावेळी २० चेंडूंत चार चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर २६ धावा केल्या. संजू बाद झाल्यावर फलंदाजीला आला तो सूर्यकुमार यादव. सूर्याकडून यावेळी भारताला मोठ्या आशा होत्या. पण सूर्याला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. भारताला एकामागून एक दोन धक्के बसले होते. पण त्यानंतर अभिषेक शर्माने संघाला सावरले.

अभिषेक शर्माने यावेळी तिलक वर्माच्या साथीने दमदार फलंदाजी करायला सुरुवात केली. अभिषेकने यावेळी २५ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. पण धावांचे आव्हान कमी असल्यामुळे त्याचे शतक होणार नाही, याचा अंदाज सर्वांना होता. पण तरीही अभिषेकने आपल्या फलंदाजीची धार कमी केली नाही. अभिषेकने अर्धशतकानंतरही धडाकेबाज फटकेबाजी सुरुच ठेवली आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकली आणि सूर्याने गोलंदाजीचा निर्णय घेतला. सूर्याचा हा निर्णय किती योग्य आहे हे अर्शदीप सिंगने पहिल्याच षटकात दाखवून दिले. अर्शदीपने पहिल्याच षटकात इंग्लंडला धक्का दिला, पण अर्शदीप फक्त यावर थांबला नाही. कारण त्यानंतरच्या षटकातही त्याने इंग्लंडला अजून एक धक्का दिला. त्यामुळे इंग्लंडची २ बाद १७ अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर कर्णधार जोस बटलरने अर्धशतक झळकावले आणि त्यामुळे इंग्लंडला शतकाच वेस ओलांडता आली. जोसने यावेळी ४४ चेंडूंत आठ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ६८ धावांची खेळी साकारली. त्यामुळे इंग्लंडला १३२ धावा तरी करता आल्या. भारताकडून यावेळी वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक तीन बळी मिळवले. पण अर्शदीप सिंग, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवत वरुणला चांगली साथ दिल्याचे पाहायला मिळाले.
 

Share This

titwala-news

Advertisement