• Total Visitor ( 724605 )
News photo

कल्याणमध्ये ‘जागर महामानवांचा’ संगीतमय महानाट्याचे आयोजन...

Raju Tapal publisher October 11, 2026 25

कल्याणमध्ये ‘जागर महामानवांचा’ संगीतमय महानाट्याचे आयोजन...



भिमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या उपस्थितीत १८ ऑक्टोबर रोजी कार्यक्रम; धम्मप्रचारासाठी आधुनिक ज्ञानरथाची निर्मिती



राजू टपाल.





कल्याण : बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासोबतच महामानवांचे विचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने नागसेन बुक डेपोच्या माध्यमातून ‘जागर महामानवांचा’ या संगीतमय महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, यावेळी भिमराव यशवंतराव आंबेडकर उपस्थित राहणार असल्याची माहिती सोमनाथ भोसले यांनी दिली.

याबाबत माहिती देताना सोमनाथ भोसले यांनी सांगितले की, नागसेन बुक डेपोच्या संकल्पनेतून एलईडी स्क्रीनयुक्त आधुनिक ज्ञानरथ साकारण्यात येत आहे. या ज्ञानरथाच्या माध्यमातून गावागावांत तसेच शहरी भागांत जाऊन बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला जाणार आहे. भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करणे, तसेच त्यांच्या जीवनकार्याची आणि ग्रंथसंपदेची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवून जनजागृती करणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

या सामाजिक आणि वैचारिक उपक्रमाचा एक भाग म्हणून ‘जागर महामानवांचा’ या संगीतमय महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय महिला शाहीर सीमा पाटील आणि संगीत दिग्दर्शक जॉली मोरे यांचा संच या कार्यक्रमात महानाट्य सादर करणार आहे. संगीत, शाहिरी आणि प्रभावी सादरीकरणाच्या माध्यमातून महामानवांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून केला जाणार आहे.

नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे!

महामानवांचे विचार, बौद्ध धम्माची शिकवण आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन सोमनाथ भोसले यांनी केले आहे. 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement