• Total Visitor ( 84592 )

जलयुक्त शिवारच्या नावाने चांगभलं,लिपिकाने तब्बल 26 कोटींचा निधी केला गायब,

Raju Tapal January 31, 2023 64

जलयुक्त शिवारच्या नावाने चांगभलं,लिपिकाने तब्बल 26 कोटींचा निधी केला गायब,
तर 5 तहसीलदार गोत्यात
लातूर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातल्या लिपिकानं केलेल्या सर्वात मोठ्या 22 कोटींच्या अपहार प्रकरणी आता अजून चार कोटींची भर पडली आहे.अपहाराचा आकडा वाढला असून या प्रकरणात 5 तहसीलदारांच्या चौकशीचे आदेश दिले आहे. त्यामुळे एकाच वेळी पाच तहसीलदारांवर कारवाईची टांगती तलवार आहे. लातूर जिल्ह्यात 2015 ते 2022 जिल्हाधिकारी शासकीय कार्यालयाशी संबंधित दोन बँक खात्यांतील 22 कोटी 87 लाख 62 हजार 25 रुपयांच्या रक्कमेचा अपहार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यानंतर आता तपासात या आकड्यात वाढ झाली असून अपहाराचा आकडा आता २६ कोटींवर गेला आहे.
हा प्रकार 2015 ते 2022 असा एकूण सात वर्षांतील असून जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निधी वितरणाचा आदेश काढण्यात आल्यानंतर हा प्रकार समोर आला. याप्रकरणी तहसीलदार महेश मुकुंद परांडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लिपिक मनोज नागनाथ फुलेबोयणे यांच्या सह अरुण नागनाथ फुलेबोयणे, सुधीर रामराव देवकते, चंद्रकांत नारायण गोगडे याच्याविरोधात स्वतःच्या आणि इतर तिघांच्या खात्यात रक्कम जमा करून शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
चार जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली त्यानंतर न्यायालयाने 30 जानेवारी पर्यंत आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र यातील तत्कालीन पाच तहसीलदारांवर देखील कारवाईचा बडगा उगारत जिल्ह्यातल्या पाच तहसीलदारांचे चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणात जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी आणि पोलीस अधीक्षक सोमेय मुंडे यांनी न बोलण्याचं ठरवलंय. त्यामुळे हे प्रकरण येत्या काळात नेमकं कोणतं वळण घेतंय आणि अपहाराचा आकडा अजून किती वाढणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Share This

titwala-news

Advertisement