केबलच्या शॉर्टसर्किटमुळे शिरूर तालुक्यातील गुनाट येथे सात एकर ऊसाचे नुकसान
सोमवारी दि.१९ ऑक्टोबरला दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास केबलच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत गुनाट ता.शिरूर येथील सात एकर ऊसाचे नुकसान झाले.
मारूती भगत, दत्तात्रय भगत, मच्छिंद्र भगत, किसन भगत, तुषार भगत, आनंदा भगत, शंकर भगत, पांडूरंग भगत अशी ऊसाचे नुकसान झालेल्या बाधित शेतक-यांची नावे आहेत.
सगळाच ऊस तोडणीला आला होता. केबलच्या शॉर्टसर्किटमुळे ऊसाला आग लागली. ऊसाचे फड एकाशेजारी एक असल्याने आग भडकत गेली.
पोलीस पाटील हनूमंत सोनवणे, महसूल विभागाचे तलाठी विजयराव बेंडभर यांनी नुकसानग्रस्त ऊसाचा पंचनामा केला. महावितरण अधिका-यांनी संबंधित जागेची पाहणी केली.
या भागातील ऊस साखर कारखाने अद्यापही सुरू झालेले नसल्याने जळालेल्या ऊसाचे करायचे काय ? हा प्रश्न संबंधित शेतक-यांपुढे उभा राहिला आहे.
बारा महिने ऊस पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळला त्यासाठी आर्थिक भार सांभाळला. ऊस जळाल्याने आता तो कवडीमोल भावाने द्यावा लागणार याचे अतीव दु:ख होत असल्याची प्रतिक्रिया गुनाट येथील ऊस उत्पादक शेतकरी दत्तात्रेय भगत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
दरम्यान, ज्या शेतक-यांचे अनधिकृत वीजजोड आहेत त्यांच्यावर तातडीने कारवाई करणार असल्याचे न्हावरे ता.शिरूर येथील महावितरणचे अभियंता बाळासाहेब टेंगले यांनी सांगितले.