• Total Visitor ( 679204 )
News photo

मनशक्ती व मनःशांती...यशाचा खरा मंत्र...

Raju Tapal publisher August 27, 2026 11

मनशक्ती व मनःशांती...यशाचा खरा मंत्र...



आजचा काळ धावपळीचा आहे. मोबाईल,स्पर्धा,नोकरी,कुटुंबाच्या जबाबदाऱ्या यात माणूस स्वतःलाच विसरून गेला आहे. शरीर थकलं तर आपण डॉक्टरकडे जातो, पण मन थकलं तर? तिथेच आपण चुकतो. खरं तर मन हेच सर्व शक्तींचं केंद्र आहे.



समर्थ रामदास स्वामी म्हणतात -



"मना सज्जना भक्तिपंथेचि जावे।

तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे॥"



मन सज्जन असेल,तरच जीवनाचा मार्ग सापडतो.



1. मनशक्ती म्हणजे काय?



मनशक्ती म्हणजे जादू नाही. मनशक्ती म्हणजे ठाम निर्णय. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16 व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली,ती मनशक्तीच होती. हातात काहीच नव्हतं,पण मनात जिद्द होती.



आपण अनेकदा म्हणतो,"माझ्याने होणार नाही." हाच आपला सगळ्यात मोठा शत्रू आहे. विज्ञान सांगतं, आपण आपल्या मेंदूची फक्त 10% शक्ती वापरतो. 90% शक्ती झोपलेली आहे. तिला जागं करणं म्हणजे मनशक्ती.



चारोळी सांगते -



मनात आणलं तर अशक्य काहीच नाही,

जिद्द असेल तर मार्ग निघतोच,

पंख नसले तरी उडता येतं,

फक्त मनात आकाश असावं लागतं.



2. मनःशांती का हरवली?



आज प्रत्येकाकडे सगळं आहे - गाडी,बंगला,पैसा.पण शांती नाही. का? कारण आपण बाहेर सुख शोधतोय. सुख बाहेर नाही,आत आहे.



तुकाराम महाराजांनी 400 वर्षांपूर्वी सांगून ठेवलंय -



"ठेविले अनंते तैसेचि रहावे।

चित्ती असू द्यावे समाधान॥"



आपण तुलना करण्यात आयुष्य घालवतो. त्याच्याकडे हे आहे,माझ्याकडे नाही. या तुलनेतूनच अशांती जन्माला येते. WhatsApp, Instagram वर दुसऱ्याचं सुख बघून आपण दुःखी होतो. पण लक्षात ठेवा,लोक फक्त सुखाचे फोटो टाकतात, दुःखाचे नाही.



3. मनशक्ती आणि मनःशांतीचा समतोल



ही दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. फक्त शक्ती असून उपयोग नाही, आणि फक्त शांती असूनही प्रगती नाही.



पोलीस दलात, शिक्षक म्हणून, समुपदेशक म्हणून काम करताना मी रोज पाहतो. अनेक तरुणांकडे प्रचंड शक्ती आहे,पण शांती नाही. त्यामुळे राग,व्यसन,नैराश्य येतं. आणि काही लोकांकडे शांती आहे,पण शक्ती नाही,त्यामुळे ते आयुष्यभर घाबरत जगतात.



खरा यशस्वी माणूस तोच, ज्याच्याकडे सिंहाची शक्ती आणि संताची शांती दोन्ही आहे.



4. मन शांत कसं करावं? माझे 5 उपाय



मी माझ्या समुपदेशन केंद्रात लोकांना हेच सांगतो -



अ) नामस्मरण - रोज सकाळी 10 मिनिटं डोळे बंद करून फक्त श्वासावर लक्ष द्या. "ॐ" चा जप करा. याने मनातील विचारांची गर्दी कमी होते.



ब) कर्मयोग - काम प्रामाणिकपणे करा, फळाची चिंता करू नका. भगवद्गीता हेच सांगते.



क) चांगली संगत - आपण कोणाच्या संगतीत राहतो, तसेच आपले मन घडते. चांगली पुस्तकं,चांगले मित्र,चांगले विचार.



ड) निसर्ग - आठवड्यातून एकदा तरी मोबाईल बाजूला ठेवा आणि झाडाखाली बसा. निसर्गाच्या सानिध्यात 1 तास फिरून या, मन आपोआप शांत होईल.



इ) सेवा - दुसऱ्यासाठी काहीतरी करा. मग बघा,जी शांती पैशाने मिळत नाही,ती सेवेतून मिळते. हाच आमच्या ॐ मन:सामर्थ्यदाता ट्रस्टचा उद्देश आहे.



ओवी -म्हणते 



मन करारे प्रसन्न। सर्व सिद्धींचे कारण।

मोक्ष अथवा बंधन। सुख दुःख मना येणे॥



शेवटी एवढंच सांगेन - शरीराला व्यायामाची गरज आहे,तशी मनालाही व्यायामाची गरज आहे. सकारात्मक विचार हाच मनाचा व्यायाम आहे.



तुमचं मन जर तुमच्या ताब्यात असेल,तर जगातली कोणतीच ताकद तुम्हाला हरवू शकत नाही. पण मनच जर तुमच्या ताब्यात नसेल,तर जगातली कोणतीच ताकद तुम्हाला जिंकवू शकत नाही.



चला, आजपासून ठरवूया - रोज 10 मिनिटं स्वतःच्या मनासाठी देऊया. मनशक्ती वाढवूया आणि मनःशांती मिळवूया.



जय मनशक्ती! जय भारत!



लेखक 



कल्पेश मनोहर शिंदे

अध्यक्ष ॐ मन:सामर्थ्यदाता चैरीट्रबल ट्रस्ट कल्याण.

संचालक-ॐ मन:सामर्थ्यदाता समुपदेशन केंद्र कल्याण 

सहशिक्षक... पदमश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ भिवंडी संचलित तळेगाव विभाग हायस्कूल तळेगाव ता मुरबाड 

युवा कीर्तनकार | समाज प्रबोधनकार | प्रवचनकार  

महाराष्ट्र शासन नियुक्त समुपदेशक  

पोलीस आयुक्तालय नियुक्त महाराष्ट्र राज्य RSP पोलीस अधिकारी

7045815703

kmshinde1710@gmail.com


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement