मुंबईत सलग ४ दिवस समुद्राला मोठी भरती येणार
समुद्रकिनारी जाणं टाळा, प्रशासनाच्या सुचना पाळा
मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून आवाहन
मुंबई :- मुंबईत येत्या 24 ते 27 जुलै 2025 या कालावधीत सलग 4 दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. त्यामुळं नागरिकांनी भरतीवेळी समुद्रकिनारी जाणे टाळावे. त्याचबरोबर समुद्राच्या भरतीच्या संदर्भात प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या इतर सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
गुरुवार, दिनांक 24 जुलै 2025 ते रविवार ते दिनांक 27 जुलै 2025 या कालावधीदरम्यान सलग 4 दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. तर, दिनांक 26 जुलै 2025 रोजी समुद्रात सर्वात मोठी म्हणजे 4.67 मीटर इतक्या उंचीची लाट उसळणार आहेत. भरती काळादरम्यान नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये, तसेच, या अनुषंगाने प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेडून नागरिकांना करण्यात येत आहे.
गुरुवार दिनांक 24 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजून 57 मिनीटांनी जोरदार लाट उसळणार आहेत. लाटांची उंची ही साधारणत: 4.57 मीटर असणार आहे. तसेच शुक्रवार दिनांक 25 जुलै 2025 रोजी दुपारी 12.40 वाजता लाटांची उंची ही 4.66 मीटर असणार आहे. शनिवार दिनांक 26 जुलै 2025 रोजी दुपारी 1.20 वाजता लाटांची उंची 4.67 मीटर असणार आहे. तर रविवार दिनांक 27 जुलै 2025 रोजी दुपारी 1.56 वाजता लाटांची उंची 4.60 मीटर असणार आहे.
दरम्यान, समुद्राच्या भरती दरम्यान, पर्यटक मोठ्या प्रमाणात समुद्रकिनारी गर्दी करतात. मात्र, अशा वेळी अपघात होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळं या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणं महत्वाचं आहे. या काळात पोलिस प्रशासन देखील त्या परिसरात तैनात करण्यात येते. मात्र, काही पर्यटक सूचना देऊनसुद्धा समुद्रकिनारी जातात. त्यामुळं मुंबई महानगरपालिकेनं काही सूचना जारी केल्या आहेत. या काळात कोणत्याही नागरिकाने समुद्रकिनारी जाऊ नये, योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे.