कल्याण-डोंबिवलीतील भाजपची पहिली 7 उमेदवारांची नावं जाहीर
राज्यात महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महानगरपालिका निवडणूक 2026 साठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान,उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून 30 डिसेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यभरात राजकीय हालचालींना चांगलाच जोर आला आहे. अनेक महापालिकांच्या निवडणुकांसाठी शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यात युती झाली आहे. मात्र,काही ठिकाणी जागावाटपावरून अद्यापही मतभेद असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशा परिस्थितीत कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणूक 2026 साठी भाजपने आपली पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
यात प्रामुख्याने
1 ) मनिषा अभिमन्यू गायकवाड
2) पुजा संजय गायकवाड
3 ) अर्चना नरेंद्र सुर्यवंशी
4 ) स्नेहल संजय मोरे
5 ) सरोज मनोज राय
6 ) प्रणाली विजय जोशी
7 ) विकी तरे
कल्याण–डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांची युती निश्चित झाली असून,त्यांच्या विरोधात शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांची आघाडी उभी राहिली आहे. युती आणि आघाडीची समीकरणे बदलल्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. युतीअंतर्गत जागावाटपाचा प्राथमिक फॉर्म्युला ठरल्याची चर्चा असून,त्यानुसार शिवसेनेला किमान 65 तर भाजपला 57 जागा मिळण्याची शक्यता आहे. या फॉर्म्युल्यामुळे कल्याण–डोंबिवलीत शिवसेना मोठा भाऊ ठरणार,अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. दरम्यान,राष्ट्रवादी काँग्रेसने युतीत 10 जागांची मागणी केली असून,त्यांना शिवसेना–भाजप युतीत स्थान मिळणार का,याबाबतचा निर्णय लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मागील महापालिका निवडणुकीतील निकाल आणि अलीकडील पक्षप्रवेश लक्षात घेता,शिवसेनेने तब्बल 71 जागांवर दावा केला आहे. त्यामुळे किमान 65 जागा मिळाल्याशिवाय युती न करण्याची भूमिका शिवसेनेने घेतली होती. दुसरीकडे,केंद्र व राज्यात सत्ता असल्याने भाजपने सुरुवातीला 84 जागांची मागणी केल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगितले जात होते. मात्र, चर्चेअंती भाजपला 57 जागांवर समाधान मानावे लागणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर जागावाटपाचा तिढा पूर्णतः सुटणार की नव्या वादांना तोंड फुटणार,याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.