लॉजच्या आडून सुरू असलेल्या देहव्यापाराचा पर्दाफाश
१२ वर्षीय अल्पवयीन मुलीसह महिलेची सुटका;AHTUची कारवाई,तिघांना अटक
नवी मुंबई :-नेरूळच्या शिरवणे गावातील एका लॉजमध्ये आडून कथितरित्या सुरू असलेल्या देहव्यापाराचा नवी मुंबई गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने (AHTU) पर्दाफाश केला आहे. या कारवाईत १२ वर्षीय अल्पवयीन मुलीसह एका महिलेची सुरक्षित सुटका करण्यात आली असून,लॉजच्या व्यवस्थापकासह तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांना शिरवणे येथील कोहिनूर पॅलेस लॉजिंग अँड बोर्डिंग येथे देहव्यापार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून सापळा रचला. माहितीची पुष्टी झाल्यानंतर AHTUच्या पथकाने लॉजवर छापा टाकून कारवाई केली. या कारवाईदरम्यान १२ वर्षीय अल्पवयीन मुलगी आणि एका महिलेची सुटका करण्यात आली. तर लॉजचा व्यवस्थापक हृदयकुमार सिंह,दीपक रामरखियानी आणि वेटर कुलेश्वर सिंह यांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील आणखी दोन संशयित आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS),पॉक्सो (POCSO) आणि अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक कायदा (PITA) अंतर्गत संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना ८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती आहे. अल्पवयीन मुलीची सुटका झाल्याने पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अधिक गांभीर्याने सुरू केला आहे. आरोपींची चौकशी करण्यात येत असून,या कथित रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का,याचा तपास AHTUकडून सुरू आहे.