पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीच्या मैदानी स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न
शिक्रापूर (प्रतिनिधी) :- पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती, शिक्षण प्रसारक मंडळाचे साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालय, तळेगाव ढमढेरे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ४५ वी आंतर महाविद्यालय मैदानी स्पर्धा दि. ८, ९ आणि १० ऑक्टोबर दरम्यान पुणे विद्यापीठातील खाशाबा जाधव क्रीडा संकुलात यशस्वीरित्या संपन्न झाली. स्पर्धेमध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील मुलांनी विजेतेपद पटकावले तर उपविजेतेपद पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालय आणि रयत शिक्षण संस्थेचे महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी यांनी संयुक्तरीत्या पटकावले. मुलींचे विजेतेपद राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाने तर उपविजेतेपद नारायणगाव येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाला देण्यात आले. तर मुले व मुलींचे सर्वसाधारण विजेते पदाचा बहुमान सांगवी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालयाला देण्यात आला. या स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील एकूण ४५८ मुले तर २३७ मुलींनी सहभाग नोंदविला. स्पर्धेमध्ये मैदानी स्पर्धेतील सर्व क्रीडा प्रकारांमध्ये स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती आणि साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालय, तळेगाव ढमढेरे यांनी संयुक्तरित्या आयोजित केलेल्या या मैदानी स्पर्धेचा औपचारिक उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या उद्घाटन समारंभ प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरे चे संचालक महेशबापू ढमढेरे, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. संदीप पालवे, पुणे विद्यापीठाचे क्रीडा संचालक प्रा.डॉ. सुदाम शेळके, अधिसभा सदस्य कृष्णा भंडलकर, डॉ. रमेश गायकवाड, पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे विद्यमान अध्यक्ष प्राचार्य डॉ. अर्जुन मुसमाडे, क्रीडा समितीचे सचिव प्रा. डॉ. अमेय काळे, प्राचार्य डॉ. संजीव लाटे, प्राचार्य डॉ.के.जी कानडे, प्राचार्य डॉ. रेखा चेतवाणी, प्राचार्य डॉ. काळंगे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. स्पर्धेस शुभेच्छा देताना प्र- कुलगुरू डॉ.पराग काळकर यांनी सांगितले की, आजचे युगच हे स्पर्धेचे आहे. कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असताना प्रत्येकाला स्पर्धेचा सामना करावाच लागतो. अशा परिस्थितीमध्ये युवकांनी तंदुरुस्त राहून यशाला गवसणी घालने गरजेचे असल्याचे ते म्हणाले. मैदानी स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा याप्रसंगी प्रकुलगुरू डॉ . पराग काळकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले शिक्षण प्रसारक मंडळ व पुण्याच्या विद्या सहकारी बँकेचे विद्यमान संचालक महेशबापू ढमढेरे यांनीही स्पर्धकांना व उपस्थितांना मार्गदर्शन केले. आजच्या परिस्थितीमध्ये महाविद्यालयीन युवकांनी गुणवत्ता सिद्ध करणे काळाची गरज आहे. मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करणारे युवकच या पुढील काळात स्पर्धेमध्ये टिकणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शिक्षण प्रसारक मंडळाच्या साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयाकडे पुणे जिल्हा विभागीय क्रीडा संघाचे यजमानपद असल्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला. पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे अध्यक्ष आणि समारंभाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अर्जुन मुसमाडे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून यजमान महाविद्यालय म्हणून पुणे जिल्ह्यातील महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांचा आणि समितीचा आलेख निश्चित उंचावला जाणार असल्याचा आशावादही डॉ. मुसमाडे यांनी व्यक्त केला. पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे सचिव प्रा. डॉ. अमेय काळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. क्रीडा समितीच्या माध्यमातून आयोजित केलेल्या विविध स्पर्धा आणि नियोजनाचा त्यांनी आढावा घेतला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संदीप सांगळे यांनी सूत्रसंचालन तर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. पराग चौधरी यांनी आभार मानले.