पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांना अटक
------------------
वेल्हे तालुक्यातील आंबवणे येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक फोडून चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघा आरोपींना वेल्हे पोलीसांनी अटक केली.
आकाश रोहिदास तळेकर वय -२२ रा.आंबवणे ता.वेल्हे जि.पुणे, संकेत रामदास खाडे वय - १९ रा.पारवाडी ता.भोर अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे शाखा व्यवस्थापक वसंत मारूती साळूंके यांनी याबाबत फिर्याद दिली.
बँकेच्या मागील खिडकीची जाळी काढून बँकेत प्रवेश करून तिजोरीचा स्ट्रॉनरूम मध्ये चोरट्यांनी प्रवेश केला होता. परंतू बँकेतील तिजोरी उघडता न आल्याने बँकेचे कोणत्याही प्रकारे आर्थिक नुकसान झाले नाही.
वेल्हे पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता फुटेजमध्ये आढळलेल्या व्यक्तींच्या निरीक्षणावरून व मिळालेल्या माहितीनुसार आंबवणे गावातील युवक आकाश तळेकर व इतर संशयितांस ताब्यात घेतले असता चोरीचा प्रयत्न केला असल्याची कबुली दिल्यानंतर आरोपींवर गुन्हा दाखल केला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार व सहका-यांनी ही कारवाई केली.