शर्यतीचा बैल चोरून नेल्याप्रकरणी तिघेजण वडगाव निंबाळकर पोलीसांच्या ताब्यात
शर्यतीचा बैल विकत दिला नाही म्हणून चोरून नेल्याचा प्रकार बारामती तालुक्यातील मानाजीनगर येथे घडला.
संयोग संभाजी साबळे रा.बहूळ ता.खैड , प्रवीण शिवाजी घेणंद रा.चाकण, ता.खेड ,रोहित संजय यादव रा.कडाचीवाडी ता.खेड अशी बैलाच्या चोरीप्रकरणी पकडण्यात आलेल्यांची नावे असून पोलीसांनी एका दिवसात चोरट्यांना पकडून बैल ताब्यात घेतला.
ऊसतोड मजूर रमेश रामा करगळ सध्या रा.म्हसोबाची वाडी ,मानाजीनगर ता.बारामती, मूळ रा.बीड सांगवी ता. आष्टी जि.बीड यांनी बैलचोरीप्रकरणी तक्रार नोंदवली होती.
सोमवारी दि.१३/१२/२०२१ रोजी दिवसा फिर्यादी रमेश रामा करगळ ऊसतोडीला गेले असता झोपडीसमोर बांधलेला खिलार जातीचे खोंड चोरून नेले. आजुबाजूला चौकशी करून काहीही माहिती मिळाली नाही.
पोलीसांकडे जावे तर आपला भाग नाही असे समजून हताश झालेल्या फिर्यादी रमेश करगळ यांनी दिसेल त्याला माझा खोंड दिसला का हो असे विचारीत राहिले.
वडगाव निंबाळकर येथील पत्रकार सचिन वाघ यांना माहिती समजल्यावर पोलीसांकडे तक्रार नोंदविण्याचा सल्ला रमेश करगळ यांना दिला.
गुरूवार दि.१६ डिसेंबरला पोलीसांकडे तक्रार नोंदविल्यानंतर चौकशीअंती गावात चाकण भागातील लोक खिलारी खोंड खरेदी साठी येवून गेल्याची माहिती मिळाल्याने सखोल चौकशी करून तिघांना ताब्यात घेतले.
पोलीस ठाण्यात आरोपींना आणल्यानंतर त्यांनी अगोदर चोरलेला खोंड विकत मागितलेची माहिती पुढे आली.
फौजदार गणेश कवितके , पोलीस नाईक हिरालाल खोमणे, दादासाहेब डोईफोडे, गोपाळ जाधव यांनी तपास केल्याची माहिती वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी पत्रकारांना दिली