सत्तेची मस्ती,बॅनरबाजीची दादागिरी!
नेत्यांची चमकोगिरी,प्रशासनाची बघ्याची भूमिका;ठाण्याचे सौंदर्य धोक्यात!
ठाणे:- निसर्गाचे सौंदर्य खुलवायचे की बॅनरच्या जाळ्यात शहराला गुरफटायचे? गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवातही ठाण्यात बॅनरबाजीचा उन्माद वाढला असून,शहराच्या सौंदर्याची ऐशीतैशी सुरू आहे. सुशोभीकरणावर कोट्यवधींचा खर्च करणाऱ्या महापालिकेला हे विद्रूपीकरण दिसत नाही का? आणि स्वतःच्या प्रसिद्धीसाठी बॅनर लावणाऱ्या राजकीय नेत्यांना ठाण्याच्या सौंदर्याचे काहीच देणेघेणे नाही का? रस्ते,चौक आणि सार्वजनिक ठिकाणांचे सौंदर्य खुलवण्यासाठी महापालिका विविध उपक्रम राबवते. मात्र,त्याच ठिकाणी राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी केली जात असेल,तर या सुशोभीकरणाचा उपयोग काय? एकीकडे सुंदर ठाण्याच्या घोषणा करायच्या आणि दुसरीकडे शहराचे रूप विद्रूप करायचे, हा कसला दुटप्पीपणा? शहराच्या सौंदर्याची काळजी केवळ भाषणांतून व्यक्त करून चालणार नाही;ती कृतीतूनही दिसली पाहिजे. महापालिका प्रशासनानेही आता बघ्याची भूमिका सोडण्याची वेळ आली आहे. नियम सर्वसामान्यांसाठीच आहेत का? राजकीय नेत्यांच्या बॅनरवर कारवाई करताना प्रशासनाचे हात का आखडतात,असा प्रश्न उपस्थित होत आहे. अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करणे,ते तातडीने हटवणे आणि पुन्हा असे प्रकार घडू नयेत यासाठी प्रभावी यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. ठाणेकरांनो,शहर आपले आहे;त्याचे सौंदर्य जपण्याची जबाबदारीही आपलीच आहे. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी सार्वजनिक जागा व्यापणाऱ्या बॅनरबाजीला विरोध करा. राजकीय नेत्यांनीही आत्मपरीक्षण करावे आणि महापालिकेने नियमांची कठोर अंमलबजावणी करावी. अन्यथा,'सुंदर ठाणे,स्वच्छ ठाणे' ही घोषणा केवळ कागदावर राहील आणि बॅनरच्या गर्दीत शहराचे खरे सौंदर्य हरवून जाईल. शहराची ओळख नेत्यांच्या बॅनरने नव्हे,तर निसर्गाच्या सौंदर्याने निर्माण होते. प्रसिद्धीपेक्षा पर्यावरणाला प्राधान्य देण्याची वेळ आली आहे. ठाणे सुंदर ठेवणे ही केवळ प्रशासनाची नव्हे,तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.
डॉ.प्रशांत सिनकर (पर्यावरण अभ्यासक,ठाणे)