• Total Visitor ( 726773 )
News photo

ठाणे जिल्ह्यात महिला सक्षमीकरणाचा वेग वाढला...

Raju Tapal publisher October 14, 2026 19

ठाणे जिल्ह्यात महिला सक्षमीकरणाचा वेग वाढला...



जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली ‘माविम’ची आढावा बैठक संपन्न...



ठाणे :- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम),ठाणे अंतर्गत जिल्ह्यात राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचा व कामांचा सविस्तर आढावा जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित जिल्हास्तरीय तेजस्विनी- सल्लागार समितीच्या आढावा बैठकीत घेण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात पार पडलेल्या या बैठकीत माविमच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांची सर्वंकष माहिती सादर करण्यात आली.

बैठकीच्या सुरुवातीला माविमचे जिल्हा व्यवस्थापक संजय गर्जे यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील उपक्रमांची आणि आर्थिक उद्दिष्टांची आकडेवारी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडली. ठाणे जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी आणि मुरबाड या ३ ग्रामीण तालुक्यांसह ठाणे, कल्याण,उल्हासनगर,अंबरनाथ,बदलापूर व भिवंडी या ६ महानगरपालिका क्षेत्रांत माविमचे कार्य विस्तारलेले आहे. नवतेजस्विनी,एमएसआरएलएम,अल्पसंख्याक आणि शहर उपजीविका अभियानांतर्गत (NULM) जिल्ह्यात एकूण १७ हजार ९९४ महिला बचत गट सक्रीय असून,त्याद्वारे २ लाख १३ हजार ६४५ महिलांना संघटित करण्यात आले आहे. नवतेजस्विनी प्रकल्पांतर्गत समाविष्ट असलेल्या सर्व २ लाख १३ हजार ६४५ महिलांना विविध उप-प्रकल्पांमध्ये १०० टक्के सहभागी करून घेण्यात माविमच्या ठाणे जिल्हा कार्यालयाला यश आले आहे. बचत गटांच्या आर्थिक बळकटीकरणासाठी बँकेच्या कर्ज पुरवठ्यात लक्षणीय कामगिरी झाली आहे. सन २०२५-२६ या वर्षात २५ हजार १७३.७५ लाख रुपयांच्या कर्ज उद्दिष्टाच्या तुलनेत २६ हजार ८२०.४३ लाख रुपयांचे कर्जवाटप करून १०५ टक्के उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे. तसेच २०२६-२७ या वर्षासाठी ३४ हजार ६९३.२४ लाख रुपयांचे क्रेडिट प्लॅन नियोजन आखण्यात आले आहे. महिलांच्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी कृषी सेवा केंद्र, भिवंडी येथील भरारी गारमेंट युनिट,शेतमाल खरेदी-विक्री,पापड उद्योग,वारली कलाकृती आणि डाळ मिल यांसारखे ४२ उप-प्रकल्प १०० टक्के यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहेत. आर्थिक विकासासोबतच महिलांचे आरोग्य,पोषण आणि सामाजिक सुरक्षितता यावरही विशेष भर देण्यात आला आहे. ५ लोकसंचलित साधन केंद्रांच्या (CMRC) माध्यमातून ७५ हिमोग्लोबिन तपासणी शिबिरे व ५० न्यूट्रिशन कॅम्प १०० टक्के पूर्ण करण्यात आले. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी ७५ वर्मी कंपोस्ट व दशपर्णी अर्क युनिट उभारण्यात आले असून,१०० एकर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आले आहे. पर्यावरण संवर्धनासाठी १ हजार ९५५ महिलांनी प्लास्टिक मुक्ती,वृक्षारोपण व सेंद्रिय कृषी प्रशिक्षण अभियानात सहभाग नोंदवला. याशिवाय,'कायदा साथी' उपक्रमांतर्गत १५९ महिलांना कायदेशीर प्रशिक्षण देण्यात आले असून,२५५० महिलांची नावे ७/१२ व ८-अ उताऱ्यांवर नोंदवून त्यांना मालमत्तेत संयुक्त हक्क मिळवून देण्यात आला आहे. या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीस जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नमिता शिंदे,माविमच्या सहाय्यक व्यवस्थापक वर्षा पाटील,जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अभिषेक पवार,जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग अधिकारी मारुती दळवी,RSETI चे संचालक आशिष लोहकरे आणि जिल्हा प्रकल्प सल्लागार हेमंत पाटील यांच्यासह लोकसंचलित साधन केंद्रांच्या प्रतिनिधी व बचत गटाच्या प्रमुख महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement