टिटवाळ्यात महिला शिक्षिकेच्या घरात चोरी
Raju Tapal
October 20, 2022
54
टिटवाळ्यात महिला शिक्षिकेच्या घरात चोरी
इस्त्रीवालाच निघाला चोर. .
टिटवाळ्यात एका महिला शिक्षिकेच्या घरी चोरीची घटना घडली असून तिच्याच ओळखीच्या इस्त्री दुकान चालवणाऱ्याने चोरी केल्याचे स्पष्ट झाले असून टिटवाळा पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन बुधवारी कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कस्टडी दिलेली आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, टिटवाळ्यातील डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या मागे असलेल्या सिद्धी विनायक टॉवर मध्ये भाड्याने एका खाजगी शाळेत शिकविणारी शिक्षिका राहते. तिला भाड्याने रूम घेऊन देणारा आरोपी विनोद कनोजिया याचे श्री सिद्धी विनायक पॉवर लॉंड्री नावाचे दुकान आहे. महिला शिक्षिका हिला घर भाड्याने घेऊन दिल्यामुळे त्यांची चांगलीच ओळख झाली होती. त्याचाच गैरफायदा घेऊन सदरील शिक्षिका ही शाळेत गेली असताना तसेच तिचा पती रात्रपाळीवरून घरी नसताना दरवाजा लोटून गेली. याचाच फायदा घेत आरोपी विनोद कनोजिया याने घेऊन दरवाजा उघडा असल्याचे पहात व घरी कुणीच नसल्याचा डाव साधत त्याने त्या महिला शिक्षिकेच्या घरातील कपाट उचकटून त्यातील अडीच तोळे वजनाचा सोन्याचा नेकलेस, पाच ग्रॅम वजनाचा मांग टिक्का,पाच ग्राम वजनाचे कानातील झुमके,सात ग्राम वजनाच्या तीन अंगठ्या व ओम नावाचे पान असे एकूण 69 हजार 500 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेऊन त्याने पळ काढला. टिटवाळा पोलिसांनी फिर्यादी महिला शिक्षिकेच्या संशयावरून आरोपी विनोद कनोजिया याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने अगोदर कबुली दिली नाही मात्र पोलिसांनी पोलिसी हिसका व सीसीटीव्ही रेकॉर्डिंग च्या माध्यमातून त्यानेच चोरी केली असल्याचे सिद्ध केले. कल्याण तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंगटे व त्यांच्या पथकाने उत्कृष्ट तपास करून सदरील चोरी उघडकीस आणून आरोपी विनोद कनोजिया याला ताब्यात घेतले. दरम्यान बुधवारी त्याला कल्याणच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे. याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंगटे हे करीत आहेत.
Share This