आंबळे दरोड्यातील दोन सराईत दरोडेखोरांना अटक
शिक्रापूर :- शिरूर तालुक्यातील आंबळे येथील वृद्धेला मारहाण करुन १ लाख ६४ हजार रूपयांचे दागिने लुटणा-या दोन सराईतांना पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व शिरूर पोलीसांनी अटक केली.
संजय तुकाराम गायकवाड वय -४५ भोकरदन जि.जालना,सागर सुरेश शिंदे वय -१९ मंठा जि.जालना अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्यावर १९ दरोडे,जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
सिल्वर रंगाच्या गाडीचा वापर करत सहा दरोडेखोरांनी ६ जुलैला पहाटे आंबळे येथील घरात घुसून लाकडी दांडक्याने महिलांना मारहाण करत मंगळसूत्र,कर्णफुले,जोडवी असे दागिने जबरदस्तीने लुटले होते.कल्पना प्रताप निंबाळकर या ६० वर्षीय महिलेने दरोड्याबाबत शिरूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली होती.
पोलीसांनी या दरोड्याचा तपास सुरू करून चोरीसाठी वापरलेल्या गाडीच्या शोधासाठी १५० किलोमीटर पर्यंत सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढत नगर -पुणे रस्त्यावर सापळा रचून आरोपींना अटक केली.