अल्पवयीन मुलीवर अत्याचार-हत्या प्रकरणी विशाल गवळीला अटक
आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकार प्रयत्न करणार श्रीकांत शिंदे
कल्याण:-कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिची हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. अत्याचारानंतर पिडीत मुलीची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी मुख्य आरोपी विशाल गवळीला अटक करण्यात आली आहे. तसेच आरोपीच्या पत्नीलाही अटक करून तिला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. भिवंडीतील बापगाव परिसरातील कब्रस्तानमध्ये पिडीतेचा मृतदेह विविस्त्र अवस्थेत आढळून आला. सोमवार (२३ डिसेंबर) पासून अल्पवयीन मुलगी बेपत्ता होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल गवळीला पोलिसांनी शेगावमधून ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, आरोपी विशाल गवळीवर याआधीच बलात्कार, पोक्सो आणि विनयभंगासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत.त्याच्यावर तडीपारचीही कारवाई केली होती, सध्या तो जामिनावर बाहेर होता. या प्रकरणी अल्पवयीन मुलीला रिक्षातून नेणाराही पोलिसांच्या ताब्यात आहे. आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी पिडीतेच्या कुटुंबियांची मागणी केली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी बुधवारी पिडीत कुटुंबियांची भेट घेतली. प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, पोलिसांकडून प्रकरणाची चौकशी सुरु आहे. असे कृत्य करणाऱ्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा कशी होईल, यासाठी सरकार प्रयत्न करेल आणि १०० टक्के आरोपीला फाशीची शिक्षा होईल, असे श्रीकांत शिंदे म्हणाले.
आरोपीची पत्नी साक्षी गवळी म्हणाली, सोमवारी ५ च्या सुमारास आरोपी विशालने अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला घरी घेवून आला होता. त्यानंतर मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली. हत्येनंतर विशालने तिचा मृतदेह एका बॅगेत बांधून ठेवला होता. संध्याकाळी ७ च्या सुमारास घरी आल्यानंतर विशालने मला सर्व घटना सांगितली, असे आरोपीच्या पत्नीने सांगितले.
ती पुढे म्हणाली, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दोघांनी योजना आखली. यापूर्वी घरातील सर्व पुरावे नष्ट केले. त्यानंतर विशालने रात्री ९ वाजता मित्राची रिक्षा बोलावून बापगावच्या दिशेने जात मृतदेह फेकला. मृतदेह फेकून घरी परतत असताना आरोपीने दारू विकत घेतली. त्यानंतर पत्नीच्या गावी बुलढाणा येथे निघून गेला.