तळेगाव ढमढेरे येथील गुजर प्रशालेत फिरत्या प्रयोगशाळेचे आगमन
शास्त्रीय उपकरणे हाताळण्याची विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संधी
विजय ढमढेरे
शिक्रापूर (प्रतिनिधी) :- शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत बुधवार दिनांक ३० जुलै २०२५ रोजी एलजी फिरत्या विज्ञान प्रयोग शाळेचे आगमन झाले.
या फिरत्या विज्ञान प्रयोग शाळेचे शिक्षण प्रसारक मंडळ व विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे यांच्यावतीने तसेच प्रशालेच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. या फिरत्या प्रयोगशाळेचा उद्देश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे आकर्षित करणे हा आहे. या उपक्रमामध्ये विज्ञानातील छोटे छोटे प्रयोग पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करणारे धडे तसेच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शास्त्रीय उपकरणे हाताळण्याची संधी यावेळी मिळाली. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन विविध प्रयोगांचे प्रत्यक्ष अनुभव घेतले.
प्रामुख्याने द्रवरूप नायट्रोजनची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष स्वरूपात दाखविण्यात आली. या सत्रांमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक सोमनाथ मुर्तडक यांनी विद्यार्थ्यांना प्रयोग समजावून सांगितले. प्रयोगाचे प्रात्यक्षिक दाखवत असताना दिग्दर्शकांनी प्रयोगामध्ये विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेतले व सहभागी विद्यार्थ्यांना या फिरत्या प्रयोगशाळेतर्फे प्रोत्साहन म्हणून पुस्तके ही भेट देण्यात आली.
या फिरत्या प्रयोगशाळेमार्फत डॉक्टर प्राध्यापक संजय ढोले,व्यवस्थापक रवींद्र मगर असिस्टंट मॅनेजर डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, निशांत जगताप, सोमनाथ मुर्तडक, राहुल जगताप, अभिषेक काकडे, मनन पोपट, अभिमन्यू सूर्यवंशी या सर्वांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना प्रयोगाबद्दल आवड निर्माण व्हावी व प्रयोगांचे आपल्या आयुष्यात असणारे महत्त्व याबद्दल महेशबापू ढमढेरे यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले. प्रशालेच्या विज्ञान विषयाच्या उपशिक्षिका अर्चना गोरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक दहिफळे,पर्यवेक्षक मोहन ओमासे, ज्येष्ठ शिक्षक रवींद्र सातपुते प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरेचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर, मानद सचिव अरविंददादा ढमढेरे, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, ज्येष्ठ संचालक विजयराव ढमढेरे ,विद्या सहकारी बँकेचे संचालक महेशबापू ढमढेरे यांनी हा उपक्रम स्तुत्य,कौतुकास्पद असल्याचे म्हटले.