• Total Visitor ( 505060 )
News photo

आरटीई प्रवेशासाठी ४० हजारांची लाच

Raju Tapal publisher May 02, 2026 20

आरटीई प्रवेशासाठी ४० हजारांची लाच



शिवसेना पदाधिकारी माउली जगताप एसीबीच्या जाळ्यात,गुन्हा दाखल.



पिंपरी-चिंचवड :- शिक्षण हक्क कायदा ( RTE ) अंतर्गत प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना एका व्यक्तीस रंगेहात पकडले. आकुर्डी येथील फकीरभाई पानसरे पिंपरी-चिंचवड उर्दू प्राथमिक शाळेत गुरुवारी दुपारी सुमारे दोनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणात ज्ञानेश्वर उर्फ माउली जगताप (रा. नंदनवन कॉलनी,चिंचवडेनगर,चिंचवड) याला ताब्यात घेण्यात आले आहे. माउली जगताप हे शिवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष असून,शिवसेना कामगार सेनेतही ते पदाधिकारी आहेत. तसेच ते पिंपरी-चिंचवड शहरातील माजी युवा सेना शहर प्रमुख म्हणूनही कार्यरत होते. सध्या ते एका खासदारांचे निकटवर्ती असल्याची माहिती पुढे येत आहे. तक्रारदार (वय ३०) यांनी आपल्या मुलीच्या आरटीई प्रवेशासाठी १६ मार्च रोजी ऑनलाइन अर्ज केला होता. अर्जाची पडताळणी करण्यासाठी २७ एप्रिल रोजी ते संबंधित शाळेत गेले असता, त्यांचा अर्ज ‘रिजेक्ट’ झाल्याचे सांगण्यात आले. याचवेळी माउली जगताप यांनी संपर्क साधत प्रवेश निश्चित करून देण्याचे आमिष दाखवले आणि त्यासाठी ४० हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे आरोपीने शाळेच्या पहिल्या मजल्यावर लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. या कारवाईनंतर आरटीई प्रवेश प्रक्रियेतील गैरप्रकार पुन्हा एकदा समोर आले असून,पालकांना मध्यस्थांच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करण्यास भाग पाडले जात असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. या प्रकरणातून आणखी मोठा गैरप्रकार उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान,या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात येत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आरोपीला अटक केली आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement