आधी आता बाह्यवळण रस्ता करावा,मगच उड्डाणपूल !....
वाघोलीकरांची महायुती सरकारकडे मागणी
-[उड्डाण पुलाचे काम सुरू करण्यापूर्वी पर्यायी बाह्यवळण रस्ता नियोजनाचा अभाव]-
फुलगाव (गौतम पाटोळे):- वाघोली परिसरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता,उड्डाणपूल व मेट्रो प्रकल्पाच्या कामांना सुरुवात करण्यापूर्वी पर्यायी बाह्यवळण/ आरपी (RP) रस्ता पूर्ण करावा,अशी मागणी वाघोलीकरांकडून करण्यात येत आहे. विकासाला विरोध नसून,नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आधी पर्यायी रस्त्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी,अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे तसेच केंद्र व राज्यातील महायुती सरकारच्या प्रयत्नांतून देशभरात रस्ते,पूल आणि मेट्रोसारख्या पायाभूत सुविधा वेगाने उभारल्या जात आहेत.त्याचाच भाग म्हणून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) मार्फत वाघोली येथे उड्डाणपूल आणि मेट्रो प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करत सरकारचे आभार मानले आहेत. मात्र,गेल्या १५ वर्षांत वाघोलीची लोकसंख्या सुमारे पाचपट वाढल्याने वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. सकाळी ८ ते १० आणि सायंकाळी ४ नंतर वाघोली चौकातून बाहेर पडण्यासाठी तब्बल एक ते दीड तास लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होत असून,शालेय विद्यार्थी,ज्येष्ठ नागरिक,रुग्णवाहिका आणि नोकरदार वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांच्या मते,उड्डाणपूल आणि मेट्रोची कामे एकाच वेळी सुरू झाल्यास पर्यायी रस्ता नसल्यामुळे वाहतूक कोंडी आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे "आधी पायाभूत सुविधा,मग मोठे प्रकल्प" हे धोरण अवलंबून प्रथम बाह्यवळण/ आरपी (RP) रस्ता आणि वाघोली-नगर रोडवरील पर्यायी मार्ग पूर्ण करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. वाघोलीकरांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या प्रश्नात लक्ष घालून वाघोलीकरांना तातडीने दिलासा द्यावा,अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. नागरिकांनी,"विकासाला आमचा विरोध नाही;मात्र विकासाची कामे करताना नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम लक्षात घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.फिती कापणे नंतरही होईल,पण जनतेचा वेळ आणि संयम वाचवणे आज अधिक गरजेचे आहे,"अशी भावना वाघोलीकरण कडून व्यक्त केली जात आहे. [पुणे ते शिरूर या होणाऱ्या उड्डाण पुलावरून वाहतूक करताना १ किलो मीटरला ९ रुपये प्रमाणे टोल आकारणी होणार आहे.आणि हा पूल झाल्यानंतर २५ वर्ष टोल आकारणी होणार आहे.त्यामुळे या होणाऱ्या पुलावरून होणारी वाहतूक ही सर्वसामान्यांना न परवडणारी वाहतूक ठरणार आहे.तसेच पुलाचे काम सुरू करण्यापूर्वी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बाह्यवळण रस्ताही यांनी केला नाही.त्यामुळे अधिकच वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागेल.यासाठी बाह्यवळण रस्त्याची उपाययोजना करणे गरजेचे ठरणार आहे. - राजेंद्र सातव पाटील,अध्यक्ष-वाघोली विकास प्रतिष्ठान(वाघेश्र्वर देवस्थान) तथा माजी उपसरपंच-वाघोली] [उड्डाणपुलाच्या भूमिपूजनापूर्वी बाह्यवळण (RP) रस्ता पूर्ण करण्याची प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक होते. त्यामुळे पुलाचे काम सुरू असताना वाहतूक पर्यायी मार्गाने वळवता आली असती. मात्र,वाहतूक कोंडीचा पुरेसा विचार व नियोजन न करता भूमिपूजन होत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागू शकते. - कमलाकर सातव पाटील,पुणे जिल्हाध्यक्ष,काँग्रेस]