बल्याणी येथे कथित बोगस डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल !
केडीएमसीच्या वैद्यकीय विभागाची कारवाई; आशीर्वाद क्लिनिकमधील प्रमाणपत्रांची तपासणी
राजू टपाल.
टिटवाळा:-कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाने बल्याणी परिसरात वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या आशीर्वाद क्लिनिकचे संचालक डॉ.शिवकुमार सिंग यांच्याविरोधात कारवाई केली आहे. त्यांच्या शैक्षणिक पात्रतेसह वैद्यकीय व्यवसायासाठी सादर केलेल्या प्रमाणपत्रांबाबत आक्षेप नोंदविण्यात आला असून, वैद्यकीय अधिकारी डॉ. तृणाली महातेकर यांच्या तक्रारीवरून टिटवाळा पोलिसांनी गेल्या आठवड्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या नवनियुक्त प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.सपना रामोळे यांनी माहिती दिली.
वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर डॉ.रामोळे यांच्या कार्यकाळातील ही पहिलीच कारवाई असल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांच्या पत्रानंतर पालिकेची कारवाई
खडकपाडा पोलिसांनी ऑगस्ट महिन्यात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाला पत्र पाठवून टिटवाळा-बल्याणी परिसरात एक व्यक्ती कथितरीत्या अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करत असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर पालिकेच्या वैद्यकीय विभागाने संबंधित दवाखान्याची तपासणी करण्याची तयारी केली.
त्यानुसार गेल्या आठवड्यात पालिकेच्या बहुउद्देशीय कर्मचाऱ्यांसह आरोग्य विभागाच्या पथकाने बल्याणी-आंबिवली रस्त्यावरील आशीर्वाद क्लिनिकला भेट दिली. या पथकात अजय विचारे, आकाश कडाळी, हरेश चौधरी आणि टिटवाळा आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.सुकेशी कासले यांचा समावेश होता.
पथकाने डॉ.शिवकुमार सिंग यांची ओळख करून दिल्यानंतर त्यांच्याकडे वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेली प्रमाणपत्रे मागितली. त्यावेळी त्यांच्याकडे विविध संस्थांची प्रमाणपत्रे आढळून आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.महातेकर यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
विविध प्रमाणपत्रे आढळल्याचा दावा
तपासणीदरम्यान संबंधित व्यक्तीकडे ऐरावत पॅरामेडिकल एज्युकेशन संस्थेचे नॅचरोपॅथी प्रमाणपत्र, डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाचे डायट आणि वेट मॅनेजमेंटविषयक प्रमाणपत्र, अॅमडस विद्यापीठाचे प्रमाणपत्र तसेच आयुष मेडिकल मेंबरशिपशी संबंधित कागदपत्रे आढळल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या तक्रारीनुसार, संबंधित प्रमाणपत्रे महाराष्ट्र वैद्यकीय परिषद, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन आणि महाराष्ट्र होमिओपॅथी कौन्सिल यांच्याकडे नोंदणीकृत असल्याचे आढळले नाही. तसेच, शासनाच्या लागू नियमांनुसार संबंधित चिकित्सा पद्धती आणि पात्रतेच्या आधारे वैद्यकीय व्यवसाय करण्याच्या अधिकाराबाबत आक्षेप नोंदविण्यात आला आहे.
दवाखान्यातील साहित्याचीही तपासणी
पथकाने आशीर्वाद क्लिनिक आणि न्यूट्रिशन सेंटरची तपासणी केली असता, डॉ. शिवकुमार सिंग यांच्या नावाचे रुग्ण तपासणी पेपर, रक्तचाचणी अहवाल, अनुसया मिस्त्री यांच्या नावाने दिलेले मृत्यू प्रमाणपत्र, रिकाम्या सिरिंज तसेच बीएचएमएस आणि डीएनडब्ल्यूएम असा उल्लेख असलेला शिक्का आढळल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या कागदपत्रांची आणि साहित्याची दखल घेत संबंधित व्यक्ती अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचा संशय वैद्यकीय विभागाने व्यक्त केला. त्यानंतर डॉ.महातेकर यांनी वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित क्लिनिकविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.
अनधिकृत वैद्यकीय व्यवसायावर पालिकेचे लक्ष
नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये वैद्यकीय पात्रता आणि आवश्यक नोंदणी महत्त्वाची असते. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करून वैद्यकीय व्यवसाय केला जात असल्याची तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित यंत्रणांकडून तपासणी आणि कायदेशीर कारवाई केली जाते.
बल्याणी परिसरातील या प्रकरणामुळे अनधिकृत वैद्यकीय व्यवसायाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या प्रकरणात पोलिसांकडून पुढील तपासात काय निष्पन्न होते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.