लक्ष्मण देवराम सोनावणे महाविद्यालयात इतिहास मंडळाचे उत्साहात उद्घाटन
राजू टपाल.
कल्याण :- कल्याण होलसेल मर्चंट्स एज्युकेशन सोसायटीच्या लक्ष्मण देवराम सोनावणे कला व वाणिज्य महाविद्यालय,कल्याण येथे इतिहास विभागाच्या वतीने दि.१ सप्टेंबर २०२६ रोजी इतिहास मंडळाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या अॅनी अँथोनी तसेच उपप्राचार्य प्रा.डॉ.मोरे सर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.संजय घुडे,पोलीस अंमलदार,महामार्ग पोलीस मदत केंद्र,माळशेज उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून इतिहास मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. इतिहास मंडळाच्या प्रमुख प्रा.डॉ.पद्मजा वेर्णेकर यांनी प्रास्ताविकातून मंडळाची भूमिका स्पष्ट केली. विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी आवड निर्माण करणे,ऐतिहासिक वारशाचे जतन करणे तसेच विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची वृत्ती विकसित करणे हा इतिहास मंडळाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. प्रमुख पाहुणे डॉ.संजय घुडे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात पोलीस विभागातील विविध करिअरच्या संधी,स्पर्धा परीक्षांची तयारी,रस्ता सुरक्षा नियम तसेच ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्याचे महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यासाठी अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) प्रवीण साळुंखे,पोलीस अधीक्षक (मुख्यालय) डॉ.सुनील भारद्वाज,पोलीस अधीक्षक महामार्ग ठाणे परिक्षेत्र निलेश सोनवणे,पोलीस उपअधीक्षक विजय गायकवाड,पोलीस निरीक्षक संतोष खानविलकर तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक व माळशेज पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी मनीष मोरे यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभत असल्याचे नमूद केले. इतिहास मंडळाच्या उद्घाटनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी पारंपरिक ऐतिहासिक वेशभूषा स्पर्धा,नृत्य व गायन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. विविध स्पर्धांमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.दिपाली कुऱ्हाडे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.