गोवेली महाविद्यालयात पदवी प्रदान समारंभ संपन्न ३०० हून अधिक विद्यार्थ्यांचा गौरव
कल्याण :- जीवनदीप शैक्षणिक संस्था संचलित,कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,गोवेली येथे शैक्षणिक वर्ष २०२४–२५ चा पदवी प्रदान समारंभ शनिवारी (१८ एप्रिल २०२६) मोठ्या उत्साहात व दिमाखदार वातावरणात पार पडला. या समारंभात विविध विद्याशाखांतील ३०० हून अधिक विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य डॉ.अशोक वाघ यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून राज्य गुप्तचर विभागाचे सहआयुक्त मा.डॉ.रवींद्र अनंत शिसवे (IPS) उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना करिअर,स्पर्धा परीक्षा आणि जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित मान्यवर नितीनजी भास्कर शिंग्रे यांनी शिस्त,परिश्रम आणि ध्येयवाद यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. कार्यक्रमादरम्यान महाविद्यालयातील महाराष्ट्र पोलीस दलात निवड झालेल्या सहा विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या यशाचा सर्वांनी उत्स्फूर्त टाळ्यांच्या गजरात गौरव केला.समारंभात विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत महाविद्यालयातील आठवणींना उजाळा दिला आणि शिक्षक व पालकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. “हा दिवस आमच्यासाठी अविस्मरणीय आहे,” असे सांगत विद्यार्थ्यांनी पुढील आयुष्यात महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे होते. त्यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारी जपण्याचे आवाहन केले. या प्रसंगी संचालक शांताराम भोईर,प्रशांत घोडविंदे,नरेश पाटील,उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे यांच्यासह सर्व,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.सतीश लकडे यांनी केले.