विद्यार्थी विकास व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
नालासोपारा :- भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका व थोर समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नालासोपारा येथील स्व. कृष्णा मोरू पाटील देशमुख विद्यालय (मराठी माध्यम),तुळिंज येथे विद्यार्थी विकास व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रो. डॉ. दिनेश गुप्ता ‘आनंदश्री’ हे प्रमुख पाहुणे व मुख्य वक्ते म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेत डॉ. गुप्ता यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेत उत्तम यश मिळवण्यासाठी आणि टॉपर होण्यासाठी पाच प्रभावी मंत्र सांगितले. आपल्या प्रभावी व प्रेरक शैलीत त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन,आत्मविश्वास,योग्य माइंडसेट आणि सातत्याचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांच्या ऊर्जादायी मार्गदर्शनाने उपस्थित सर्वांची मने जिंकली. या वेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुजाता कुशेर तसेच शिक्षकवृंद प्रताप कावले,प्रियांका वायंगणकर,प्रणिता राऊत व श्री मनीष दलवी विशेष उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्कायनेटचे संचालक राहुल गुप्ता यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नवी ऊर्जा आणि यशासाठी दृढ निश्चय दिसून आला.