नवीन अभ्यासक्रम शिकविण्यासाठी शिक्षक होणार सज्ज
प्रशिक्षणाचे विविध टप्पे निश्चित;तज्ज्ञांचा समावेश करण्यावर भर
अमरावती :- राज्यात यंदा इयत्ता,दुसरी,तिसरी,चौथी आणि सहावीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला असून नवी पाठ्यपुस्तके लागू केली आहेत. दरम्यान,शाळा सुरू झाल्यानंतर नवीन अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांच्या हातातही पडतील,परंतु तो अभ्यासक्रम शिकविणाऱ्या शिक्षकांचे प्रशिक्षण अद्यापही अपूर्णच आहे. हे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) नियोजन केले असून सर्व प्रशिक्षणे १० जुलैपर्यंत पूर्ण करण्याचा परिषदेचा मानस आहे. शिक्षकांना दिलेल्या जनगणनेच्या कामांमुळे हे प्रशिक्षण पुढे ढकलावे लागले असल्याचे 'एससीईआरटी'ने स्पष्ट केले असून शिक्षक प्रशिक्षणाचे नवे वेळापत्रक जाहीर केले आहे. 'एससीईआरटी'चे सहसंचालक डॉ. कमलादेवी आवटे यांनी प्रशिक्षण वेळापत्रक आणि सूचनांचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. 'राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०' नुसार राज्यातील राज्य मंडळाच्या शाळांमध्ये २०२५-२६ शैक्षणिक वर्षापासून नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. यानुसार इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीच्या शिक्षकांचे राज्यस्तरीय प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. तर सहावीच्या शिक्षकांचे प्रशिक्षण बाकी आहे. जनगणनेच्या कामामध्ये शिक्षकांचा सहभाग असल्याने प्रशिक्षणाचे वेळापत्रक पुढे ढकलावे लागले होते.
विशेष शिक्षक,सधन व्यक्तींचाही समावेश
इयत्ता सहावीच्या राज्यस्तरीय प्रशिक्षक प्रशिक्षणासाठी मराठी माध्यमातील २४४ आणि उर्दू माध्यमातील २४० प्रशिक्षक अपेक्षित आहेत. संबंधितांचा तपशील १५ जूनपर्यंत सादर करावा. प्रत्येक वर्गाच्या प्रशिक्षणात जिल्ह्यात कार्यरत विशेष शिक्षक,साधन व्यक्तींचाही समावेश करावा. त्यांना नवीन अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देण्याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यांनी अनुभवी शिक्षक,व्याख्याते,पर्यवेक्षकीय अधिकारी आणि अभ्यासक्रम निर्मितीत सहभागी तज्ज्ञांचा समावेश करण्याबाबत सूचना केल्या आहेत. नवीन अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण सुट्टीच्या कालावधीत आयोजित करण्याचे नियोजन होते. त्यासाठी प्रयत्नही करण्यात आले. मात्र,जनगणनेच्या कामामुळे प्रशिक्षण पुढे ढकलावे लागले. आता १० जुलैपर्यंत चार इयत्तांचे तालुकास्तरापर्यंतचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात येईल.
डॉ. हेमंत वसेकर,संचालक,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद
असे आहे वेळापत्रक
इयत्ता सहावीचे शिक्षक :-१७ आणि १८ जूनला पूर्वतयारी कार्यशाळा होणार. त्यानंतर राज्यस्तरीय प्रशिक्षण २२ ते २५ जून या कालावधीत होईल. जिल्हास्तरीय प्रशिक्षण २९ जून ते २ जुलै,तर तालुकास्तरीय प्रशिक्षण ४ ते १० जुलैदरम्यान होईल.
इयत्ता दुसरीचे शिक्षक:- जिल्हास्तरीय प्रशिक्षण १८ ते ३० जून तर तालुकास्तरीय प्रशिक्षण २२ जून ते २ जुलै या कालावधीत होईल.
इयत्ता तिसरी आणि चौथीचे शिक्षक : १८ ते ३० जून या कालावधीत जिल्हास्तरीय प्रशिक्षण,तर २४ जून ते ४ जुलै या कालावधीत तालुकास्तरीय प्रशिक्षण होईल.
या प्रशिक्षणाची जबाबदारी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडे (डाएट) सोपविण्यात आली आहे.