बॅनरबाजीचा बाजार...पालिका प्रशासन लाचार?...
बॅनरच्या आड शहराचे विद्रूपीकरण...‘राजकीय नेते बोले,पालिका डोले!’...
ठाणे:-ठाणे शहराच्या सुशोभीकरणासाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही अनधिकृत बॅनरबाजीने शहराचे विद्रूपीकरण थांबण्याचे नाव घेत नाही. बॅनर पडून अपघात होण्याची घटना घडल्यानंतर नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला. त्यानंतर ठाणे महापालिकेने मोठा गाजावाजा करत अनधिकृत बॅनरविरोधात धडक कारवाई सुरू केली. मात्र,ही कारवाई आता पुन्हा कागदावरच राहिल्याचे चित्र आहे. दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने शनिवारी ठाणे शहरातील विविध भागांत कार्यकर्त्यांनी लावलेले राजकीय नेत्यांचे मोठमोठे बॅनर,शुभेच्छा फलक आणि जाहिराती झळकत होत्या. शहराच्या प्रमुख रस्त्यांपासून चौकांपर्यंत बॅनरबाजीचा सुळसुळाट असताना महापालिकेच्या यंत्रणेने मात्र सोयीस्कर मौन बाळगल्याचे दिसून आले. काही दिवसांपूर्वी बॅनर दुचाकीस्वारावर पडूनही प्रशासनाला धडा मिळाला नाही का ? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच कारवाईचा दिखावा करायचा आणि परिस्थिती निवळताच पुन्हा डोळेझाक करायची,असा प्रकार सुरू असल्याचा आरोप होत आहे. शहराच्या सुशोभीकरणासाठी कोट्यवधींचा खर्च आणि दुसरीकडे त्याच शहराच्या विद्रूपीकरणाकडे महापालिकेचे दुर्लक्ष, हा विरोधाभास ठाणेकरांच्या संतापाचा विषय ठरत आहे. नियम सर्वांसाठी समान असतील तर राजकीय नेत्यांच्या बॅनरवर कारवाई करण्याचे धाडस पालिका प्रशासन दाखवणार का,असा थेट सवालही नागरिकांकडून केला जात आहे. बॅनर काढण्याच्या आदेशांचा गाजावाजा करून उपयोग काय, जर दुसऱ्याच दिवशी पुन्हा तेच बॅनर शहरभर झळकणार असतील? त्यामुळे ठाणेकरांमध्ये आता एकच चर्चा रंगली आहे‘राजकीय नेते बोले, पालिका प्रशासन डोले सुशोभीकरणावर कोट्यवधी खर्च करून शहर सजवायचे आणि बॅनरबाजीने ते विद्रूप होताना डोळेझाक करायची, हा कसला विकास? पालिकेची कारवाई नेत्यांच्या बॅनरपुढेच थांबते का?
डॉ. प्रशांत सिनकर (पर्यावरण अभ्यासक ठाणे)