• Total Visitor ( 430001 )
News photo

शिल्प सौंदर्याचा उत्कृष्ट नमुना पुरंदर तालुक्यातील श्री.भुलेश्वर 

Raju tapal July 28, 2025 91

शिल्प सौंदर्याचा उत्कृष्ट नमुना पुरंदर तालुक्यातील श्री.भुलेश्वर 



विजय ढमढेरे 

शिक्रापूर (प्रतिनिधी) :- जागृत देवस्थान, शिल्प सौंदर्याचा उत्कृष्ट नमुना म्हणून प्रसिद्ध असलेले पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथील श्री.भुलेश्वर श्रावणी यात्रेसाठी सज्ज झाले आहे.

माळशिरस ( ता‌.पुरंदर ) येथील भुलेश्वर देवस्थान संबंधित पौराणिक आख्यायिका सांगितली जाते.

हिमालयात भगवान शिव,माता पार्वती यांच्यात सारीपाटाच्या खेळादरम्यान भांडण झाले. शिवशंकर रागाने हिमालय सोडून पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथील भुलेश्वरी डोंगरावर तपश्यर्येसाठी आले. माता पार्वतीने भिल्लिनीचे रूप घेवून नृत्य करत शिवशंकरांना भुलविले. त्यामुळे या स्थानाला "भुलेश्वर" नाव पडले. रागावलेल्या शिवशंकरांनी माता पार्वतीला तोंड न पाहाण्याचा शाप दिला. यामुळे भुलेश्वर मंदिरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेले टेकवडी गावातील कुमजाई मातेचे मंदिर. या दोन्ही मंदीरामधून एकमेकांचे दर्शन होत नाही.

यादव राजाने १२ व्या शतकात बांधलेले हे मंदीर तीन घुमटांनी युक्त आहे. मंदीरातील सभामंडप, रामायण महाभारतातील युद्धप्रसंगाचे नक्षीकाम, रावणाने केलेले सीताहरण यासारखी शिल्पे भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

प्रदक्षिणा मार्गावर गणेशाचे श्रीरूप मध्यभागी सुंदर शिवलिंग,समोरील भव्य नंदी यांचे दर्शन घडते. वर्षातून दोनदा सूर्याची पहिली किरणे थेट शिवलिंगावर पडतात. यासाठी नंदीची मान उजवीकडे वळविण्यात आल्याचे समजते. ब्रम्हा,विष्णू,महेश यांची लिंगेही येथे आहेत. पेढे आणि दूध केळीचा प्रसाद येथे ठेवला जातो.

श्रावण महिन्यातील चार सोमवारी भरणा-या यात्रेत माळशिरस येथील काळेवाड्यातून श्री.भुलेश्वर देवाची मानाची पालखी मिरवणूकीने भुलेश्वराकडे प्रस्थान करते. भुलेश्वरी पाण्याच्या कुंडात देवाला स्नान घालून महाआरती होते. दुपारी ३ वाजता मंदीराच्या मुख्य प्रवेशद्वारावर धार घातली जाते. चौथ्या सोमवारी सासवड येथील तेल्या भुताच्या कावड मिरवणुकीने यात्रेची सांगता होणार आहे.

         


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement