कल्याण येथे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय सुरू करावे
आमदार किसन कथोरे यांची केंद्र व राज्य सरकारकडे मागणी
अंबरनाथ :- कल्याण येथे स्वतंत्र प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय सुरु करण्याची मागणी आमदार किसन कथोरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह,केंद्रीय परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. सध्या ठाणे,रायगड व पालघर सह अनेक जिल्ह्यांतील नागरिकांना मुंबई प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातून सेवा दिली जाते. वाढती लोकसंख्या आणि पासपोर्टसाठी वाढणारी मागणी लक्षात घेता कल्याण येथे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय स्थापन करणे ही काळाची गरज असल्याचे आमदार किसन कथोरे यांनी नमूद केले आहे. कल्याण येथे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय सुरू झाल्यास कल्याण-डोंबिवली,भिवंडी,अंबरनाथ,बदलापूर,मुरबाड,शहापूर,नेरळ आणि कर्जत परिसरातील नागरिकांना फार मोठा लाभ होणार आहे. या सर्व शहरे व तालुक्यांची एकत्रित लोकसंख्या सुमारे ४० ते ४५ लाखांपेक्षा अधिक असून औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि शिक्षणाच्या वाढत्या संधींमुळे परदेशात शिक्षण,नोकरी,व्यवसाय,पर्यटन आणि वैद्यकीय उपचारांसाठी पासपोर्टची मागणी सातत्याने वाढत आहे. सध्या या भागातील नागरिकांना पासपोर्टसंदर्भातील विविध कामांसाठी ठाणे किंवा मुंबई येथे जावे लागते. ठाणे आणि मुंबई येथील कार्यालयांमध्ये आधीच गर्दी वाढत आहे. या कार्यालयांची क्षमता लक्षात घेता नागरिकांना प्रतीक्षा यादीत थांबावे लागते. तात्काळ मध्ये सुद्धा ताण वाढत आहे. त्यात या विभागातून जाणाऱ्या नागरिकांना लगेच वेळ मिळू शकेल अशी शक्यता कमी असते. ठाणे आणि मुबई येथील कार्यालयात जाण्याने नागरिकांचा प्रवासाचा खर्च,वेळ आणि कामाचा दिवस वाया जातो. ज्येष्ठ नागरिक,महिला,विद्यार्थी,दिव्यांग,नोकरदार तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. दिवसेंदिवस पासपोर्टची मागणी वाढत आहे. त्या बरोबरच पासपोर्ट नूतनीकरण करणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढत आहे. या सर्व बाबी लक्षात घेता कल्याण येथे नवीन स्वतंत्र प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय सुरु करणे अत्यंत आवश्यक असल्याचे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले. अलीकडेच मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या मागणीचे निवेदन आमदार किसन कथोरे यांनी दिले. कल्याण येथे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय सुरू झाल्यास लाखो नागरिकांचा वेळ व प्रवास खर्च वाचेल. पासपोर्ट अर्जांच्या जलद व कार्यक्षम प्रक्रियेला गती मिळेल. विद्यार्थी,उद्योजक,व्यावसायिक आणि परदेशात रोजगारासाठी जाणाऱ्या युवकांना मोठा दिलासा मिळेल. ठाणे व मुंबई येथील विद्यमान पासपोर्ट कार्यालयांवरील ताण फार कमी होईल. वाढत्या लोकसंख्येला दर्जेदार व सहज उपलब्ध शासकीय सेवा मिळतील. भविष्यातील कल्याण महानगर क्षेत्राच्या प्रशासकीय गरजाही अधिक प्रभावीपणे पूर्ण करता येतील. केंद्र व राज्य सरकारने आमदार किसन कथोरे यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून कल्याण येथे लवकरात लवकर प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय मंजूर करावे. या निर्णयामुळे ठाणे,रायगड व परिसरातील लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. शासनाच्या नागरिकाभिमुख सेवांना अधिक गती मिळेल,असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे कोकण विभागाचे आयटी सेल संयोजक तसेच ठाणे ग्रामीण जिल्ह्याचे उपाध्यक्ष मिलिंद धारवाडकर यांनी या व्यक्त केला आहे. आमदार किसन कथोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना निवेदन दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणी संदर्भात केंद्र सरकारकडे तात्काळ प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती मिलिंद धारवाडकर यांनी दिली.