• Total Visitor ( 430493 )
News photo

दादरच्या कबूतरखान्याजवळ मोठा राडा

Raju tapal August 13, 2025 75

दादरच्या कबूतरखान्याजवळ मोठा राडा;

कबुतरखाना बंदीच्या समर्थनार्थ मराठी एकीकरण समितीचे आंदोलन;

आंदोलकांची पोलीसांकडून धरपकड 



मुंबई :- मुंबईतील कबुतरखाना बंदीच्या समर्थनार्थ आज मराठी एकीकरण समितीच्या वतीनं आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. आज मराठी एकीकरण समितीच्या वतीनं कबुतरखाना परिसरात आंदोलन केले जात आहे. सध्या दादरच्या कबुतरखाना बंदीच्या समर्थनार्थ मराठी एकीकरण समितीकडून आंदोलन केले जात आहे. यावेळी काही आंदोलकांना पोलिसांना ताब्यात घेतल्याने कबुतरखान्याचा वाद चिघळल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यावेळी मराठी एकीकरण समितीकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.



मराठी एकीकरण समितीने कबुतरखान्याच्या बाहेर आज आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. काल रात्रीच पोलिसांनी मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना नोटीस पाठवल्या होत्या. मात्र, यानंतरही आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते दादर कबुतरखान्याच्या परिसरात येऊन धडकले. मराठी एकीकरण समितीचे पदाधिकारी गोवर्धन देशमुखही याठिकाणी आले. त्यांनी पोलिसांना भेटून निवेदन देण्याची मागणी केली. मात्र, गोवर्धन देशमुख यांनी दादर कबुतरखान्याच्या परिसरात पाऊल ठेवताच पोलिसांच्या एका तुकडीने त्यांना गराडा घातला आणि त्यांना पकडण्यासाठी प्रयत्न सुरु केले. पोलिसांनी आम्हाला सहकार्य करावं एवढंच मागणी आहे. आणीबाणीचा काळ आणू नका, असे गोवर्धन देशमुख यांनी म्हटले.



यावेळी मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. अखेर पोलिसांनी गोवर्धन देशमुख यांना ताब्यात घेऊन गाडीत टाकले. यानंतर मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. पोलिसांनी आज सकाळपासूनच दादर कबुतरखान्याच्या परिसरात अतिरिक्त कुमक मागवून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. या परिसरातील दुकानंही बंद ठेवण्यात आली होती. मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते याठिकाणी येताच पोलिसांनी त्यांना पकडून गाडीत कोंबायला सुरुवात केली. गोवर्धन देशमुख यांना अवघ्या काही मिनिटांत पोलिसांनी गाडीत टाकून पोलीस ठाण्यात नेले. त्यामुळे पोलिसांनी 6 ऑगस्टला जैनधर्मीयांना सहजपणे आंदोलन करु दिले, मग मराठी माणसांना तोच न्याय का लावला जात नाही, असा सवाल आंदोलकांनी विचारला आहे.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement