• Total Visitor ( 686976 )
News photo

नवीन अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना

Raju Tapal publisher September 01, 2026 58

नवीन अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना



भातकुली तालुकास्तरीय शिक्षक प्रशिक्षणाला उत्स्फूर्त सुरुवात;इयत्ता तिसरी व चौथीच्या ८० शिक्षकांचा सहभाग



अमरावती/भातकुली :- राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२०च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रात राज्य अभ्यासक्रम आराखडा–शालेय शिक्षण तयार करण्यात आला असून,त्यानुसार नवीन अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर,सक्षम आणि प्रभावी संवादक बनविण्यावर या नवीन अभ्यासक्रमात विशेष भर देण्यात आला आहे.

याच अनुषंगाने भातकुली तालुकास्तरीय शिक्षक प्रशिक्षणास सुरुवात झाली आहे. हे प्रशिक्षण ३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या कालावधीत अमरावती येथील जि.प.माध्यमिक मुलांची शाळा,सायन्सकोर येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात इयत्ता तिसरी व चौथीला अध्यापन करणारे सुमारे ८० शिक्षक व शिक्षिका सहभागी झाले आहेत. या प्रशिक्षणासाठी इलियात खान इनायत खान,सतीश देशमुख,अर्चना गेडाम आणि अर्चना पर्वतकर हे सुलभक म्हणून मार्गदर्शन करीत आहेत. गटशिक्षणाधिकारी रामेश्वर माळवे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विषयतज्ज्ञ चंद्रकांत कडवे यांच्या नियंत्रणात प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षणाच्या प्रारंभीच्या टप्प्यात मातृभाषेचा मूलभूत आणि विशेषत्वाने विचार होणे आवश्यक असल्याचे अभ्यासक्रमाच्या प्रस्तावनेत स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना मातृभाषेतून आत्मविश्वासाने व्यक्त होण्याची,स्वतःचे मत मांडण्याची तसेच त्यांच्या प्रतिभाशक्तीचा विकास करण्याची संधी मिळावी, हा नवीन अभ्यासक्रमामागील महत्त्वाचा उद्देश आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा–शालेय शिक्षणातील मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे महाराष्ट्राचा अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्राची ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरा,स्थानिक वैशिष्ट्ये,विविध विचारसरणी आणि स्थानिक गरजा यांचाही अभ्यासक्रम निर्मितीत विचार करण्यात आला आहे. एकविसाव्या शतकातील आधुनिक विज्ञान,कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माहिती-तंत्रज्ञानाच्या युगातील आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम नागरिक घडविणे,हे या अभ्यासक्रमाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक क्षमता विकसित करून त्यांना भविष्यातील संधींचा आत्मविश्वासाने उपयोग करता यावा, यासाठी अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. अभ्यासक्रमातील ध्येये आणि क्षमता-विधानांनुसार अध्ययन निष्पत्ती व उपनिष्पत्ती निश्चित करण्यात आल्या आहेत. त्या साध्य करण्यासाठी आवश्यक अध्ययन अनुभव,अध्ययन-अध्यापन साधने तसेच मूल्यमापन निर्देश निश्चित करण्यात आले आहेत. शिक्षकांना अध्यापन कार्यात मार्गदर्शक व साहाय्यभूत ठरेल आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी करता येईल,अशा पद्धतीने अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. या नव्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना उत्तम वाचक,प्रभावी संवादक,आत्मविश्वासी आणि जबाबदार नागरिक बनण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे नवीन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे शिक्षण क्षेत्रातून सांगण्यात येत आहे.असे प्रसिद्धीप्रमुख राजेश सावरकर यांनी कळविले आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement