जिल्हा परिषद ठाणे कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
ठाणे :- १९ फेब्रुवारी,२०२६ रोजी प्रकल्प संचालक यांचे कार्यालय,टीएमसी पार्किंग प्लाझा,८ वा मजला, लक्ष्मी नगर,ज्युपिटर हॉस्पिटलजवळ येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात व अभिमानाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवर व कर्मचाऱ्यांनीही पुष्पांजली अर्पण करून शिवरायांना विनम्र अभिवादन केले.याप्रसंगी प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी मार्गदर्शन करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आढावा घेत कर्मचाऱ्यांना कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा व लोकाभिमुख प्रशासनाची जाणीव ठेवण्याचे मार्गदर्शन केले. शिवरायांच्या राष्ट्रप्रेम,धैर्य व संघटन कौशल्यातून प्रेरणा घेऊन विकासकामे अधिक परिणामकारकपणे पूर्ण करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्र) अविनाश फडतरे यांनी आपल्या मनोगतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य,दूरदृष्टी,सुशासन व लोककल्याणकारी धोरणांचा उल्लेख करत त्यांच्या आदर्शांवर चालण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की,शिवरायांचे स्वराज्य हे न्याय, समता व पारदर्शक प्रशासनाचे प्रतीक होते. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविणे व जनतेच्या सेवेस तत्पर राहणे हीच खरी शिवजयंती साजरी करण्याची भावना आहे. या कार्यक्रमास सहाय्यक प्रकल्प अधिकारी आरती गगे,कनिष्ठ प्रशासन अधिकारी हर्षद मोरे, विस्तार अधिकारी (सा) संतोष पांडे,वरिष्ठ सहाय्यक नारायण उंबरगोंडे,कनिष्ठ सहाय्यक विशाल कोदर्लीकर,डेटा ऑपरेटर तुषार वाणी तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे वातावरण राष्ट्रभक्ती व उत्साहाने भारलेले होते. उपस्थितांनी शिवरायांच्या विचारांचे स्मरण करून समाजहितासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.