मुलांशी संवाद हाच यशस्वी पालकत्वाचा पाया” – डॉ. सॅम न्यूटन
सर आयझॅक न्यूटन यांच्या १४व्या पिढीतील वंशजांचे प्रादेशिक मनोरुग्णालय,ठाणे येथे मार्गदर्शन
ठाणे:- “मुलांचे वर्तन समजून घेण्यासाठी त्यांच्याशी सतत संवाद साधणे,त्यांच्या भावनांना मान्यता देणे आणि त्यांना प्रेमळ व सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मुलांशी संवाद हाच यशस्वी पालकत्वाचा खरा पाया आहे,”असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मानसशास्त्रज्ञ,शिक्षणतज्ज्ञ (आयझॅक न्यूटन यांच्या १४व्या पिढीतील वंशज) डॉ. सॅम न्यूटन यांनी केले. प्रादेशिक मनोरुग्णालय,ठाणे येथे पालकत्व कौशल्ये (Parenting Skills), किशोरवयीन मानसिक आरोग्य आणि डिजिटल युगातील आव्हाने या विषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते. डॉ.न्यूटन यांनी बालपणापासून किशोरावस्था आणि तरुणावस्थेपर्यंत मुलांच्या मानसिक,भावनिक आणि सामाजिक विकासातील विविध टप्प्यांवर सविस्तर मार्गदर्शन केले. आजच्या वेगवान आणि तंत्रज्ञानप्रधान युगात मुलांच्या भावविश्वाला समजून घेणे ही पालकांसमोरील सर्वात मोठी गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. सोशल मीडियाचा वाढता प्रभाव,मोबाईल आणि इंटरनेटचा अतिरेकी वापर यामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यासमोर निर्माण होणाऱ्या आव्हानांकडे लक्ष वेधताना त्यांनी डिजिटल शिस्तीचे महत्त्व अधोरेखित केले. ‘पॅरेंटल कंट्रोल्स’चा योग्य वापर,मुलांच्या ऑनलाइन हालचालींवर सकारात्मक देखरेख आणि कुटुंबातील संवाद वाढविणे यामुळे अनेक समस्या टाळता येऊ शकतात,असे त्यांनी सांगितले. व्याख्यानातील विशेष आकर्षण ठरले ते “Inside Out” आणि “Moana” या लोकप्रिय चित्रपटांच्या उदाहरणांद्वारे केलेले मार्गदर्शन. भावनिक बुद्धिमत्ता,आत्मजाणीव,नातेसंबंध,जबाबदारी आणि जीवनमूल्ये यांची प्रभावी मांडणी करत मुलांच्या भावनिक विकासासाठी अशा चित्रपटांचा उपयोग होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमास मनोरुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी,शुश्रूषा अधिकारी,मानसिक आरोग्य व्यावसायिक तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुलांचे मानसिक आरोग्य जपणे ही केवळ पालकांची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. योग्य मार्गदर्शन,संवेदनशीलता आणि संवाद यांच्या माध्यमातून आपण भावनिकदृष्ट्या सक्षम आणि जबाबदार पिढी घडवू शकतो.
डॉ. नेताजी मुळीक (वैद्यकीय अधीक्षक प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे)