इको मोटारीच्या धडकेत वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू; सासवड - परिंचे रस्त्यावरील घटना
शिक्रापूर (प्रतिनिधी) :- पाठीमागून येणा-या भरधाव इको मोटारीने धडक दिल्याने शेतातून घरी परतणा-या यादववाडी (ता.पुरंदर) येथील वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना सासवड - परिंचे रस्त्यावर घडली.
आनंदराव रामचंद्र यादव वय -७७ वर्षे, सिंधूमती आनंदराव यादव वय -६५ वर्षे असे अपघातात मृत्यू झालेल्या वृद्ध दाम्पत्याचे नाव असून अमित यादव यांनी अपघाताबाबत दिलेल्या फिर्यादीवरून बापूराव जगताप या मोटारचालकाविरूद्ध सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आनंदराव यादव व त्यांच्या पत्नी सिंधूमती यादव हे दाम्पत्य नेहमीप्रमाणे सासवड रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात गेले होते. शेतातील कामे आटोपून संध्याकाळी घरी परतत असताना सासवड कडून परिंचे गावाच्या दिशेने जाणा-या इको क्रमांक एम एच १२ एल पी ६५७१ मोटारीने या दाम्पत्याला पाठीमागून जोरदार धडक दिली. जखमी दाम्पत्याला रूग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.