संस्थाचालक शिक्षण मंडळ पुणे जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर, अध्यक्षपदी विजयराव कोलते, सचिवपदी ॲड.संग्राम कोंडे देशमुख
शिक्रापूर (प्रतिनिधी) :- संस्थाचालक शिक्षण मंडळ पुणे जिल्हा या संस्थेची सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. यामध्ये २१ जणांचे कार्यकारी मंडळ बिनविरोध निवडून आले. अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या शाहू कॉलेज येथील सभागृहात कार्यकारी मंडळाची सभा पार पडली. या सभेमध्ये सर्व नवनिर्वाचित कार्यकारी सदस्यांनी अध्यक्षपदी विजयराव कोलते तर सचिवपदी ॲड. संग्राम कोंडे-देशमुख यांची निवड केली. उपाध्यक्षपदी अनिल मेहेर व प्रमिलाताई गायकवाड यांची निवड करण्यात आली.खजिनदारपदी महेशबापू ढमढेरे ,सहसचिवपदी वीरसिंह रणसिंग यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेमार्फत नवीन शिक्षक, शिक्षकेतर भरती बरोबरच विद्यार्थ्यांना गुणवत्ताधारक शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जाईल. ज्या शिक्षण संस्थांना प्रशासकीय अडचणी येतील अशा संस्थांना मार्गदर्शन केले जाईल. शिक्षण संस्थांना भौतिक सुविधा, प्रशासकीय बाबी व गुणात्मक विकास करण्यासाठी संस्था प्रभावीपणे कार्य करेल असे अध्यक्ष विजयराव कोलते यांनी यावेळी निवडीनंतर मनोगतात सांगितले. संस्थाचालक शिक्षण मंडळ हे नवीन शैक्षणिक धोरणानुसार सर्वांशी संवाद साधून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रयत्न करेल. तसेच शिक्षकांचे प्रश्न राज्य शासनाकडून सोडवण्यासाठी प्रयत्न करेल.संस्थांचे असणारे अनेक प्रश्न राज्य शासन व शिक्षण विभागाच्या प्रमुखांशी चर्चा करून सोडवण्यात येतील असे आश्वासन संस्थेचे नवनिर्वाचित सचिव ॲड.संग्राम कोंडे देशमुख यांनी यावेळी दिले. या बैठकीचे प्रास्ताविक ॲड. प्रदीप वळसे पाटील केले. ॲड. संग्राम कोंडे देशमुख यांनी आभार मानले. कार्यकारिणीवर संचालक म्हणून निवड झालेले ॲड.देवेंद्र बुट्टे पाटील,संग्राम मोहोळ, गणपत बालवडकर, डॉ. प्रसन्नकुमार देशमुख, प्रा.नंदकुमार निकम, महादेव कांचन, संदीप कदम, जयश्री पलांडे, शिवाजी खांडेकर, भाऊसाहेब ढमढेरे, प्रवीण भोसले, अजित वडगावकर, डॉ. राजेंद्र कांबळे, नंदकुमार शेलार व सल्लागार मंडळाचे अध्यक्ष वि.ल.पाटील व सदस्य यावेळी उपस्थित होते.